STATE NEWS तुझ दुसऱ्यासोबत लग्न जमलय, माझा जगुन काय फायदा! शेवटच्या भेटीत प्रियकराने प्रेयसीच्या समोर तिच्याच ओढणीने घेतला गळफास
Updated: Oct 17, 2022, 07:49 IST
पुणे( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): प्रेम हे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं असं कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणत असले तरी काहीच प्रेम हे वेगळचं असत. प्रेमासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. पुण्यातील सिंहगड परिसरात तीन वर्षांच्या प्रेमाचा अतिशय दुर्दैवी शेवट झाला. जिच्यावर जीवापाड प्रेम केले त्या प्रेयसीचे लग्न जमल्याने हताश झालेल्या प्रियकराने माझा आता जगुन काय फायदा असे म्हणत तिच्यासमोर तिच्या ओढणीने गळफास लावून घेत जीवन संपवले.
प्राप्त माहितीनुसार आत्महत्या करणारा तरुण २५ वर्षांचा आहे. तीन वर्षांपासून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र तरुणीचे तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याशी लग्न ठरवले. तेव्हापासून तरुण प्रचंड नैराश्यात होता. आता शेवटची भेट म्हणून जोडपे सिंहगडाच्या परिसरातील असलेल्या गोळेवाडी येथील एका लॉजवर गेले.
तिथे तो तिच्यासमोर प्रचंड रडला. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझे दुसऱ्याशी लग्न झाल्यावर माझा जगून काय फायदा असे म्हणत त्याने तिच्या ओढणीनेच गळफास घेतला. साकीब लतिफ इनामदार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून हवेली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे.