शेतमजूर महिलेवर शेतमालकाचा बलात्कार; वर्षभरापासून तोडत होता तिच्या शरीराचे लचके!

 
सातारा : शेतात मजुरीसाठी येणाऱ्या मजूर महिलेवर शेतमालकाने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे हा प्रकार समोर आला आहे. उमेश भोसले असे अटक करण्यात आलेल्या शेतमालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी उमेश भोसले याच्या शेतात मजुरी कामासाठी जात होती. तिच्या गरिबीचा फायदा उमेशने घेतला. काम आणि पैसे मिळवायचे असेल तर शारीरिक संबंध ठेवावेच लागतील नाहीतर कामावरून हाकलून देईल, असे तो तिला म्हणत होता.

उमेशने शेतमजूर महिलेवर वाई शहरातील एका लॉजमध्ये आणि त्याच्या शेतात जवळपास वर्षभराच्या कालावधीत अनेकदा बलात्कार केला. पीडित महिला सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर अत्याचार असह्य झाल्याने पीडित महिलेने बलात्काराची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी उमेश भोसले याला अटक केली.