राहुल गांधी २०२४ मध्ये होणार पंतप्रधान; महाराष्ट्रातल्या 'या' नेत्याची भविष्यवाणी

 
मुंबई : नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. ५ पैकी ४ राज्यांत भाजपने सत्ता स्थापन केली. पंजाबची सत्ता काँग्रसने गमावली. आम आदमी पार्टीच्या झाडूने पंजाचा धुव्वा उडवत राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांचे पक्षांतर यामुळे संकटात सापडलेल्या काँग्रेसच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. एवढी विपरीत परिस्थिती असतानासुद्धा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी २०२४ मध्ये पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल. राहुल गांधी द्रष्टे नेते असून, राहूल गांधी पंतप्रधान होतील, असे नाना म्हणाले. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात सध्या  जोरदार चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, की केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग भाजप करत आहे.

जनता भाजपला कंटाळली आहे. राहुल गांधी यांच्याकडे जसे व्हिजन आहे तसे मोदींकडे नाही. २०१९ च्या महामारीची पूर्वसूचना राहुल गांधींनी दिली होती. मात्र भाजपने टिंगलवाळी केली होती. या देशाला पुढील काळात फक्त काँग्रेस सांभाळू शकते, असेही नाना पटोले म्हणाले.