व्हॉट्स ॲपवर पाठवायचा महिलांचे फोटो... निवड झाल्यावर बोलवायचा लॉजवर!; पोलिसांनी छापा मारल्यावर दिसले धक्कादायक दृश्य!!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतिबानगरातील हॉटेल शशीकमल लॉजिंग - बोर्डिंगमध्ये लॉज मालक सागर पवार हा महिलांकडून जबरदस्तीने वेश्यावसाय करून आर्थिक हित साधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाईचे नियोजन केले. लॉजमालक पवार याच्याशी बनावट ग्राहकाने संपर्क साधला. तेव्हा माझ्याकडे सध्या एकच महिला आहे, तिचे फोटो तुम्हाला पाठवतो. आवडली तर अडीच हजार रुपये घेऊन दुपारी साडेतीन वाजता या, असे म्हणत त्याने फोन कट केला.
पवारने बनावट ग्राहकाला व्हॉटस् ॲपवर एका महिलेचे वेगवेगळ्या ड्रेसमधील ३ फोटो पाठवले. त्यावर आवडली, असा मेसेज बनावट ग्राहकाने पाठवला. ठरल्यानुसार बनावट ग्राहक लॉजमध्ये गेला. दरम्यान पोलिसांच्या पथकाने हॉटेल भोवती सापळा रचला होता. बनावट ग्राहकाने पोलिसांच्या पथकप्रमुखाला मिस कॉल देऊन आत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा खात्रीलायक इशारा दिला. त्यावरून पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापेमारी केली.
पोलीस आल्याचे दिसताच लॉजचा मॅनेजर दीपक ओराली(२४, रा. चिखली, ता. हवेली) हा पळून गेला. लॉजमालक पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट ग्राहक लॉजच्या रूम नंबर ११७ मध्ये असल्याचे पोलिसांना कळले. दरवाजा उघडल्यानंतर त्या खोलीत महिला अर्धनग्न अवस्थेत मिळून आली. ही महिला पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले. लॉज मालक पवार हा पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. एका ग्राहकाकडून २५०० रुपये घेऊन त्यातील १ हजार मला देत होता, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता त्यांना कंडोमचे पाकीट मिळून आले. पोलिसांनी सागर पवार यांच्या ताब्यातून साडेदहा हजार रुपये रोख व एक मोबाइल एकूण १७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग पिंपरी चिंचवडचे पोलीस निरीक्षक देवेंद्र नाईक, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे व त्यांच्या पथकाने केली.