रेल्वेस्थानकावर युवकाचे महिलेसमोर अश्लील चाळे!
Feb 5, 2022, 11:22 IST
मुंबई : मुंबईतील लोअर परळ रेल्वेस्टेशनवर संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने महिलेकडे पाहत अश्लील चाळे केले. महिलेकडे पाहत त्याने त्याचे गुप्तांग दाखवल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी ३२ वर्षीय युवकाला अटक केली आहे.
शमशाद मुमताज अन्सारी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला रोज नोकरीनिमित्त लोअर परळ ते चर्चगेट असा लोकलने प्रवास करते. ८ ते १० दिवसांपासून शमशाद रेल्वेस्थानकावर तिला गाठायचा व तिच्याकडे पाहत अश्लील चाळे करायचा. दोन दिवसांपूर्वी सकाळी महिला तिच्या भावासोबत रेल्वेस्टेशनवर आली होती.
शमशादने तिला गाठत तिच्यासमोर उभे राहत अश्लील चाळे केले व गुप्तांग दाखवले. महिलेच्या भावाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने त्याला जाब विचारला तेव्हा तो धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या भावाने पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.