महाविकास आघाडी सरकार बहुजनांचा असल्याचा जनाब संजय राऊतांचा दावा फसवा!;बहुजनांचे हित कशात हे रोज सकाळी शीर्षासन केल्यावरही तुमच्या मेंदूत शिरणार नाही.आमदार पडळकरांचा संजय राऊतांना टोला
कदाचित आम्हा बहुजनांना तुम्ही तुमच्यासारखेच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल असा टोला पडळकरांनी संजय राऊत यांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? तुमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या काळात दोन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? शेतात पीक असतांना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडली ,ते शेतकरी बहुजन नव्हते का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेल धोरणामुळे एससी, एसटी,ओबीसी, भटके विमुक्त, अ, ब, क, ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होत असा सवालही गोपीचंद पडळकरांनी केला आहे.
अडीच वर्षात धनगर आरक्षणासाठी एक साधी बैठकही तुम्हाला करता आली नाही हे कोणत बहुजन धोरण होत? सरकार स्थापनेसाठी प्रस्थापितांच्या सोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या केल्या आणि तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय तुम्ही घेतला मात्र बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते तेव्हा सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात.
कारण सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा अडीच वर्षात साधा इम्पेरिकल डेटाही तुम्ही तयार केला नाही. बहुजनांच्या पोरांनी तुमच्यासारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलायच्या हीच तुमची मुळात इच्छा आहे असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. बहुजनांच दैवत असलेल्या विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवी पताका उतरवता जे बहुजन समाज विसरलेला नाही . बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांचा तुम्ही रोज सकाळी उदो उदो करता. बहुजनांचे हित कशात आणि कुठे आहे हे रोज सकाळी शीर्षासन केल्यावरही तुमच्या मेंदूत शिरणार नाही कारण त्या करीता स्वाभिमान असावा लागतो असे गोपीचंद पडळकर म्हणाले.