दहा वर्षांनी लहान मुलाचे विवाहितेने केले लैंगिक शोषण!; म्हणे आमचे एकमेकांवर प्रेम आहे!!
२७ वर्षीय महिला अकोल्यातील गिट्टीखदान भागात भाड्याने राहते. नवऱ्याशी पटत नसल्याने ती तिच्या बहिणीच्या ९ वर्षीय मुलीला सोबत घेऊन राहते. १७ वर्षीय मुलगा त्याच भागात राहतो. दोघे अकोला एमआयडीसीतील एका दाल मिलमध्ये काम करतात. दोघांची तिथे ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मुलगा ३१ जानेवारी २०२२ रोजी बेपत्ता झाला होता. खदान पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
प्रकरण तपासात असताना ९ फेब्रुवारी रोजी मुलगा घरी परतला. पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करून मुलाला आई- वडिलांच्या ताब्यात दिले. दुसरीकडे ३१ जानेवारीपासून २७ वर्षीय विवाहित महिलासुद्धा तिच्या ९ वर्षीय भाचीला सोडून गायब होती. त्यामुळे चिमुकलीला महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले होते. घरमालकाने पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान या प्रकरणाचा एकमेकांशी काही संबंध आहे का यादृष्टीने पोलिसांनी तपास केला. मुलाची चौकशी केल्यानंतर त्याने तिच्याशी असलेल्या संबंधाची कबुली दिली. पोलिसांनी महिलेला सुद्धा ताब्यात घेतले. आधी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचे तिने सांगितले. ३१ जानेवारीपासून दोघेही सोबत राहत होते. त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे तिने पोलिसांत कबूल केले. मुलगा अज्ञान असल्याने त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत तिने त्याचे शोषण केले, असा ठपका पोलिसांनी ठेवला. महिलेला अटक करून तिच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.