अविवाहित असल्याचे सांगून तरुणीचे लग्न लावले; पतीला कळल्यानंतर त्याने विष घेऊन केली आत्‍महत्‍या!

 
दौंड : लग्न होऊन वर्षही झाले नव्हते. संसाराला नुकतीच सुरुवात झाली असताना त्याला पत्नीच्या पहिल्या लग्नाबद्दल माहीत झालं अन्‌ त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या वेळी त्याला तिच्या पुर्वायुष्याबद्दल काहीही सांगण्यात आलं नव्हतं. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने विष घेऊन जगाचा निरोप घेतला. विष घेतानाचा एक व्हिडिओसुद्धा त्‍याने बनवला. नंतर त्याच्यावर १४ दिवस उपचार सुरू होते. मात्र काळाने त्‍याच्‍यावर घाला घातलाच. तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्याच्या पत्नी व सासू, सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील बोरीपार्थी या गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील प्रशांत शेळके या तरुणाचे मागील वर्षी मेमध्ये भाग्यश्री पिसे हिच्याशी लग्न झालं. लग्नानंतर काही महिने दोघांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र काही महिन्यानंतर प्रशांतला भाग्यश्रीचे याआधी एक लग्न झाल्याचे समजले. पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू असताना तिच्या वडिलांनी तिचे लग्न प्रशांतसोबत लावून दिलं. पहिल्या लग्नाबद्दल माहीत झाल्यानंतर पती- पत्नीत रोज वाद होऊ लागले. पत्नी आणि सासू- सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून १४ फेब्रुवारीला प्रशांतने विष प्राशन केले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.