मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून खासदार छत्रपती संभाजीराजे बेमुदत उपोषणाला बसणार!
मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत आज मुंबईत त्यांनी भूमिका जाहीर केली व पुढील दिशाही ठरवली. संभाजीराजे म्हणाले, की ५ मे २०२१ रोजी आरक्षण रद्द झाले. गेल्या काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, कोणतीच मागणी झाली नाही. आता मी उद्विग्न झालो असून, सरकार काहीच हालचाल करत नसल्याने मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे.
आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा, अशी मागणी केली होती. खूप दिवसांनी याचिका दाखल करण्यात आली. त्याची सध्याची काय परिस्थिती आहे, हे सांगितले जात नाही. मोजून पाच-सहा मागण्या आहेत, त्याही मान्य होत नाहीत. ओबीसीमधून आरक्षण देण्याबद्दल संभाजी राजे म्हणाले, की आम्हाला टिकणारे आरक्षण हवंय. समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय करून आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.