प्रेम, लग्नाचे आमिष अन्‌ गर्भपात... तरुणाने धोका दिल्याने २१ वर्षीय तरुणीची पोलिसांत धाव!

 
औरंगाबाद : आधी प्रेमाचे नाटक करायचे... तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा आणि नंतर मात्र लग्नाला नकार द्यायचा... अशी प्रकरणे आता वारंवार समोर येऊ लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करून नंतर तिचा गर्भपात करवला. नंतर मात्र लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून, तक्रारीवरून शिऊर पोलिसानी चरण रूपसिंग सुलाने याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील साळेगाव येथील चरण सुलाने याने पीडित २१ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ त्याने मोबाइलमध्ये शूट केले. हे फोटो आणि व्हिडिओ तुझ्या आई- वडिलांना दाखवेल, अशी धमकी देत तो तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवायचा.

यातून ती गर्भवती राहिली. आधी तू गर्भपात कर आणि नंतर आपण लग्न करू, असे म्हणत आरोपीने तिचा गर्भपात करवला. या  सर्व गोष्टींची माहिती तरुणीच्या आई- वडिलांना  मिळाली तेव्हा आई- वडील त्याच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने लग्नाला नकार दिला. मोठा विश्वास ठेवूनही धोका देणाऱ्या प्रियकराविरुद्ध अखेर तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.