अमरावतीच्या दवाबाजारात व्हॅलेंटाईनसाठी मिळत होती वेगळीच दवा!

 
अमरावती : अमरावती येथील दवाबाजारात अवैधरित्या कामोत्तेजक गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका युवकाला औषध प्रशासन विभागाने रंगेहात पकडले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व कोणताही परवाना नसताना तो कामोत्तेजक गोळ्यांची विक्री करीत होता.
गर्भपाताच्या तसेच कामोत्तेजक गोळ्या डॉक्टरांची परवानगी असल्याशिवाय कुणालाही देता येत नाहीत. मात्र असे असले तरी छुप्या मार्गाने या गोळ्यांची विक्री होते. अमरावती येथील दवाबाजारात  एक युवक कामोत्तेजक गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून औषधी प्रशासन कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता औषध निरीक्षक मनीष गोतमारे (४३) यांनी पथकासह छापेमारी केली असता सागर नंदकिशोर साहू (३५, रा. गोपालनगर,अमरावती) हा कामोत्तेजक गोळ्यांची विक्री करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून विग्रोमेन १०० एमजीच्या १३७ गोळ्या जप्त करण्यात आल्या. व्हॅलेंटाइन वीकमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती. आरोपी सागर साहू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.