तिचं दुसरं लग्न; पण ३७६ पासून वाचण्यासाठी त्‍याची ॲडजस्‍टमेंट; प्ले बॉय निघाला नवरा, करायचा पॉर्न साईटसाठी काम!

एक चुकीचा निर्णय किती घातक ठरू शकतो याची जाणीव तिला झाली, पण झालाय आता बराच उशीर!
 
ठाणे (स्‍टेट न्‍यूज डेस्‍ककडून) ः बहीण प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर, ऐनवेळी लग्नमंडपात तिला नियोजित वरासोबत उभे करण्यात आले... मनाविरुद्ध लग्न झाल्याने तिला त्या संसारात रस नव्हता. तिने काहीच दिवसांत घटस्फोट घेतला. त्यानंतर तिचे आतेभावासोबत सूर जुळले... प्रेमाचा दिखावा करत आतेभावाने तिच्या शरीराचा उपभोग घेतला. जेव्हा तिने लग्नाचा तगादा लावला तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे ती हादरून गेली. पोलीस ठाण्यात आतेभावाविरुद्ध बलात्काराची तक्रार द्यायला जाणार होती. ही बाब आतेभावाला माहीत झाली अन् ३७६ च्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी त्याने मनात नसतानाही लग्न केले. लग्नानंतर ती कुठेतरी निघून जावी, तिने आत्महत्या करावी, असे त्याला वाटत होते... लग्न झाल्यावर तिला त्याच्याबद्दल बरंच काही कळलं. तो प्ले बॉय म्हणून काम करत होता. वेश्यावृत्तीला प्रोत्‍साहन देणाऱ्या वेबसाईटसाठी काम करायचा. यामुळे तिला आपण बरेच फसलो गेल्याची जाणीव झाली. पण हे कळायला बराच उशीर झाला होता. तिने माहेर गाठले. तीन महिने विचारमंथन केले अन्‌ ठरवले झालेल्या फसवणुकीविरोधात लढायचे... निर्धार करत तिने ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याची पायरी चढली. पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पल्लवी (२१, नाव काल्पनिक) सध्या माहेरी ठाणे शहरातील वर्तकनगर भागात राहते. २०१९ मध्ये तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न जालन्याच्या तरुणासोबत ठरले होते. मात्र तिच्या बहिणीचे दुसऱ्या मुलासोबत अफेअर असल्याने तिने ऐन लग्नाच्या दिवशी प्रियकरासोबत पळ काढला. त्यामुळे जालन्याच्या या तरुणासोबत घरच्यांनी पल्लवीचे लग्न लावून दिले. इच्छा नसताना घरच्यांनी लग्न लावून दिल्याने ती फार काळ सासरी रमली नाही. तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती पुन्हा आई- वडिलांकडे राहू लागली. याच काळात तिचे तिचा आतेभाऊ राहुल (नाव काल्पनिक, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) याच्याशी फोनवरून बोलणे व्हायचे. दोघांत व्हॉटस् ॲपवरून चॅटिंग व्हायची. त्यातूनच पल्लवी आणि राहुलचे सूर जुळले आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मी तुला आवडत असेल तर माझ्या आई- वडिलांना भेटायला उमरगा येथे ये, असा प्रस्ताव राहुलने पल्लवीसमोर ठेवला. १३ सप्टेंबर २०२० रोजीचे ठाणे ते उमरगा प्रवासाचे तिकिट जयभवानी ट्रॅव्हल्समार्फत काढून त्याने पल्लवीला पाठवले. पल्लवी राहुलच्या आई- वडिलांना भेटायला उमरगा येथे पोहोचली. राहुल तिला घ्यायला बसथांब्यावर गेला. मात्र तिला घेऊन तो घरी आई- वडिलांकडे गेला नाही.

दोघे हॉटेलमध्ये गेले. तिथे गप्पा मारल्या. आता आपले लग्न होणारच आहे, असे म्हणत राहुलने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पल्लवीने जेव्हा त्याच्या आई- वडिलांना भेटण्याचा आग्रह धरला तेव्हा आणखी थोडे दिवस आपण एकत्र राहू. एकमेकांना समजून घेऊ. आपल्या आवडी-निवडी पाहू व नंतर भेटू, असे म्हणत आई- वडिलांची भेट घेण्यास टाळाटाळ केली. त्याच्यासोबत आणखी काही दिवस राहायला त्याने भाग पाडले आणि वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. "त्यांनी माझ्याबरोबर शारीरिक संबंध केल्यामुळे मला त्यांना सोडता आले नाही. मी सर्व सहन करीत होते', असे पल्लवीने तक्रारीत म्हटले आहे. इतके दिवस गायब झाल्याने आई- वडील शोध घेत असतील म्हणून पल्लवी पुन्हा ठाणे येथे परतली... घरी परतल्यानंतर पल्लवीने सर्व हकीकत तिच्या आई- वडिलांना सांगितली. पल्लवीच्या वडिलांनी लगेच राहुलला फोन करून तू लग्नास तयार आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा मी तुमच्या मुलीला ओळखत नाही, असे म्हणत शिविगाळ केली व लग्नास नकार दिल्याचे पल्लवीने तक्रारीत म्हटले आहे. आधीच्या नवऱ्याला सोडले आणि जाच्यावर विश्वास टाकला त्या आतेभावाने फसवल्याने पल्लवी हताश झाली होती. राहुलच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची केस दाखल करणार असल्याचे राहुलला कळले. त्यामुळे राहुलने लग्नाला होकार दिला. त्यामुळे पल्लवीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. २२ मार्च २०२१ रोजी आळंदी देवाची (जि. पुणे) येथे मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत पल्लवी आणि राहुलचा विवाह झाला.

 ...अन्‌ सुरू झाली छळकहाणी!
लग्नानंतर पल्लवी आणि राहुल पुणे येथे भाड्याच्या खोलीत राहू लागले. दोनच दिवसांत पल्लवीची सासू म्हणजेच राहुलची आई तिथे राहायला आली. त्यानंतर किरकोळ कारणावरून सासू पल्लवीला टोमणे मारत होती. घरकामात चुका काढत होती. मुद्दाम वरून पल्लवीच्या आयुष्यातील जुन्या गोष्टीवरून प्रश्न विचारत तिच्याशी भांडण करत होती. तू काय घेऊन आली. तुझ्या घरातून तुझ्या बाबांनी काही दिले नाही का? तू किती लोकांबरोबर झोपलीस... असे सासू पल्लवीला म्हणत होती. भाड्याच्या घरात राहणे चालणार नाही. आम्हाला तुझ्या बापाला एक घर घेऊन द्यायला सांग, असे बोलून सासू पल्लवीला त्रास देऊ लागली. पल्लवीची सासू आणि नणंद यांच्यामध्ये फोनवर झालेले बोलणे पल्लवीने ऐकले. राहुलला ३७६ च्या केस पासून वाचविण्यासाठी लग्नाला होकार दिला. तिला असा त्रास दिला तरच ती निघून जाईल, असे सासू फोनवर बोलत होती. हे ऐकून पल्लवी खचली. मात्र मला लग्न प्रपंच वाचवायचा होता म्हणून मी छळ सहन करीत राहिले, असे पल्लवीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. काही दिवसांनी माहेरवरून घर किंवा ५० लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला हाकलून देऊ, अशी धमकीच सासू व पतीने दिली. दरम्यान राहुलने टेक महिंद्रा येथील नोकरी सोडली. त्यामुळे तो घरीच राहू लागला. त्यानंतर पल्लवीचा छळ अधिकच वाढला. त्याने पल्लवीला नोकरी करायला सांगितले. पल्लवी एका टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीत नोकरी करू लागली.

राहुलचे बिंग फुटले...
राहुल एक दिवस अंघोळीला गेला होता. तेव्हा त्याचा मोबाइल पल्लवीच्या हाती आला. राहुल एका अनोळखी महिलेला प्ले बॉयची नोकरी मागत असल्याचे पल्लवीला कळले. एस्कॉर्ट या सोशल पोर्न हबसाठी काम करणाऱ्या प्रोफाईलसाठी त्याने प्लेबॉय म्हणून काम करायला होकार कळवला होता. राहुल उमरगा येथील मित्रांना एस्कॉर्टमध्ये काम करणाऱ्या मुलींच्या फोटोंची देवाणघेवाण करत असल्याचे पल्लवीला कळाले. त्याचबरोबर तो मुलींचे रेट ठरवण्याचे सुद्धा काम करत होता. प्ले बॉय पुणे नावाने सेव्ह असलेल्या एका नंबरवर राहुलने केलेले चॅट पल्लवीला दिसले. मेरे पास अभी कोई ग्राहक नही है. जो थी वो मुंबई चली गई और उसने अब ये काम बंद किया है... असे त्यात लिहिले होते. राहुल वेश्याव्यवसाय पण चालवत होता. त्यानंतर पल्लवीला राहुलने त्याच्या बहिणीशी केलेले चॅट दिसले.

तिला त्रास द्यायचा, मारून टाकायचे... जेल तर जेल... दहा दिवसात सगळे मिटवून गावाकडे येतो... आई- वडिलांच्या मनाने दुसरे लग्न करतो, असे राहुल त्याच्या बहिणीशी बोलल्याचे पल्लवीला दिसले. तेवढ्यात राहुल अंघोळ करून बाहेर आला. पल्लवीने तिला त्याच्या कामाबद्दल विचारल्यावर तो चिडला व तिला बेदम मारहाण केली. हो मी चालवतो एस्कॉर्ट आणि तुलापण धंदा करायला लावणार, असे राहुल पल्लवीला म्हणाला. हे सर्व पाहून मी पुरती निराश झाले. मला नैराश्याने ग्रासले. माझा सर्व वेळ विचार करण्यात जाऊ लागला, असे पल्लवीने म्हटले आहे. पल्लवीने घडला प्रकार ती जिथे काम करत होती तेथील एका मॅडमला सांगितला. राहुलला याबद्दल कळल्यावर त्याने पुन्हा बेदम मारहाण केली. २१ ऑक्टोबर २०२१ राेजी राहुल त्याचे सर्व सामान भरून पुण्यावरून गावाकडे निघून गेला. पल्लवीला त्‍याने माहेरी जायला सांगितले.

फोन नंबर केला ब्लॉक...
पल्लवीने अनेकदा राहुलला फोन करून बघितला. मात्र राहुलने तिचा नंबर ब्लॉक केला होता. पल्लवीने तिच्या लग्नाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले तेव्हा तिच्या नणंदेने त्यावर किती जणांसोबत लग्न केले, अशी कमेंट केली. फेसबुक पोस्ट पाहून राहुलने मेसेज करून पल्लवीला शिविगाळ केली. पल्लवीचे नग्न फोटो पोर्न साईटवर टाकण्याची धमकी राहुलने दिली. त्यामुळे पल्लवीने ती पोस्ट फेसबुकवरून काढून टाकली. त्यानंतर राहुल आणि पल्लवीचा संपर्क तुटला. राहुलने तिला भेटण्याचा व तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नाही. राहुल विकृत मानसिकतेचा आहे. तो पोर्न साईटचे काम करत असल्याचे माहीत झाल्यापासून मी माझ्या जीवनाच्या एका वाईट टप्प्यातून जात आहे. मला फार भीती वाटत आहे, असेही पल्लवीने म्हटले आहे. पल्लवीने भरोसा सेल मध्ये तक्रार केली. मात्र राहुलने कोणतीही दाद दिली नाही. अखेर तिने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.