Breaking State news खळबळजनक ! एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या! महाराष्ट्र हादरला...!

 
सांगली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. आज, २० जून रोजी सकाळी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिका नगरात ही घटना घडली आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेते मुंबई येथे विधान परिषदेच्या निवडणूकीत व्यस्त असल्याने अजूनपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींने घटनास्थळी भेट दिलेली नाही.

पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करण्यात येत आहे. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह आत्महत्या केली आहे. मृतकांमध्ये वनमोरे बंधूची आई, दोघांच्या बायका आणि मुलाबाळांचा समावेश आहे.
 
 दोघे बंधू वेगवेगळ्या घरात आपापल्या कुटुंबासह राहत होते. एकाच्या घरात ६ तर दुसऱ्याच्या घरात ३ जणांचे मृतदेह आढळले. माणिक वनमोरे हे  व्यवसायाने डॉक्टर होते त्यांचा लहान भाऊ पोपट वनमोरे हा शिक्षक होता. दोघांनी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलीस कसून तपास करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.