प्रेयसी इंजिनियर होती, तो इंजिनियर असल्याचे तिला खोटे सांगायचा... "लग्ना'मुळे बिंग फुटणार असल्याने त्‍याने तिला संपवले!

 
मुंबई : ती २६ वर्षांची इंजिनियर, चांगला पगार... तो बेरोजगार, २९ वर्षांचा होऊनही नोकरीचा पत्ता नव्हता... दोघांत प्रेम जुळले, पण त्‍यासाठी त्‍यानेही खोटेच सांगितले, की तोही इंजिनियर आहे..! पण सर्वांच्या साक्षीने लग्नासाठी जेव्हा तिने आग्रह धरला... तेव्हा बिंग फुटणार असल्याच्या भीतीने त्‍याने तिलाच संपवले!! २६ फेब्रुवारीला वसई येथील लॉजमध्ये आढळलेल्या सायली शहासने हत्‍या प्रकरणाचे असे गूढ उकलले... तिची हत्‍या करून फरारी झालेल्या सागर नाईकने बिहारमधील मुज्जफरनगर येथील लॉजमध्ये आत्महत्या केली.

सागर नाईक हा वसईच्या वसंतनगरात राहत होता. त्याचे सायलीसोबत प्रेमसंबंध होते. २६ फेब्रुवारी रोजी तो सायलीला वसई येथील स्टेटस लॉजमध्ये घेऊन गेला होता. लॉजमध्ये सायलीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून त्याने तिची हत्या केली आणि फरारी झाला होता. बराच वेळ होऊनही खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज मॅनेजरने खोली उघडून बघितल्यावर सायली मृतावस्थेत दिसून आली होती. सागरचा मोबाइल घटनेनंतर बंद येत होता. त्यानंतर सागरने ५ मार्च रोजी बिहारच्या मुज्जफरनगरमध्ये एका लॉजमध्ये एक खोली घेतली.

६ मार्चला रात्री त्याने लॉजच्या खोलीतील पंख्याला गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिली नाही. बिहारवरून तो सीमा ओलांडून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांना सागरच्या मोबाइलवरून मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. सागरची प्रेयसी सायली इंजिनियर होती. तिला चांगल्या पगाराची नोकरी होती. सागरसुद्धा तिला मेकॅनिकल इंजिनियर असल्याचे सांगत होता. मात्र प्रत्यक्षात तो इंजिनियर नव्हता. दरम्यान, सायली लग्नासाठी आग्रह धरत होती.

तिची समजूत काढण्यासाठी २०१९ मध्ये त्याने तिच्याशी एका मंदिरात  गुपचूप लग्न केले होते. मात्र जाहीरपणे लग्न करायचे असे सायलीचे म्हणणे होते. सागर इंजिनियर नसल्याने त्याला नोकरी नव्हती. लग्न केले तर आपले बिंग फुटेल, अशी भीती सागरला वाटत होती. त्यामुळे त्याने सायलीची हत्या केली. सागर २९ वर्षांचा होऊनही नोकरी नसल्याने वैफल्यग्रस्त होता. त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला होता. केलॉन नावाचा गेम तो तासन्‌तास  खेळत राहायचा. त्यामुळे तो विक्षिप्तसारखा वागत होता, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक देसाई यांनी दिली.

पोलीस आयुक्त म्हणतात...
आठ दिवसांपासून सागर पोलिसांना चकमा देत होता. मात्र तो आमच्या हाती लागला नाही हे आमचे अपयश असल्याचे पोलीस आयुक्त सदानंद दाते म्हणाले. सागर अट्टल गुन्हेगार नव्हता. आम्ही कसोशीने प्रयत्न केले. पोलिसांपासून वाचण्यासाठी सागर खबरदारी घेत होता. त्याने फक्त ४ मार्चला काही वेळासाठी मोबाइल सुरू केला होता. तो कॅलिफोर्निया येथील एका कंपनीचा पेड इंटरनेट डेटा वापरत होता. त्यामुळे पोलीस त्याचा आयपी ॲड्रेस शोधू शकले नाही, असे पोलीस आयुक्त म्हणाले.