BULDANA LIVE EXCLUSIVE: भाजपचा बहुउद्देशीय मास्टरस्ट्रोक : भविष्यातील राजकारणाचा गेम ! एक तिर अनेक लक्ष्य!! अनेक गोष्टी चव्हाट्यावर..!
राज्यातील आघाडी सरकार अडीच वर्षे पूर्ण करण्याच्या मुहूर्तावर जून चा महिना दिवसाकाठीच नव्हे तर तासागणिक राजकीय धक्के देणारा ठरला. अत्यंत आक्रमकपणे सक्रिय झालेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकात एकाचवेळी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या पक्षांना एकहाती धोबी पछाड दिला. त्यापाठोपाठ दिल्लीश्वरांच्या मदतीने अगोदरच ठरल्याप्रमाणे त्यानंतर च्या घडामोडी घडल्या( किंवा घडवून आणण्यात आणल्या गेल्या). मग धक्कादायक राजकारणाची मालिकाच सुरू झाली. गुजरात, झाडी, डोंगर, हॉटेल युक्त आसाम आणि गोवा या ३ राज्यात घडणाऱ्या धक्कातंत्र ने ३० जूनला तर कळस गाठला. वस्तुतः या धक्का मालिकेचा ३० तारखेला शेवटचा अंक होता असे चित्र होते. पण ही मालिका दीर्घकाळ चालणारी किंबहुना ती व्हाया महापालिका २०२४ च्या लोकसभा, विधानसभा पर्यंत चालणार आहे.
भाजपचे भविष्याचे राजकारणही कारणीभूत?
मात्र केंद्रीय भाजप नेतृत्वाचा हा मास्टर स्ट्रोक केवळ विरोधकांच नव्हे तर महत्वाकांक्षी देवेंद्र फडणवीसांना पण इशारा असल्याचे मानले जात आहे. अन्यथा बाहेर राहण्याचे जाहीर करणाऱ्या या नेत्याला दोनच तासात दुय्यम स्थान स्वीकारणे भाग पडले नसते. राज्यसभा व विधानपरिषद लढतीत व आसाम वारीत देखील फोकस फडणवीस यांच्यावरच राहिला. यामुळे जेपी नड्डा यांच्या आदेशवजा आग्रह मागे अशी बहू आयामी गुंतागुंत आहे. यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद देखील बाहेर आल्याचे बोलले जात आहे.
मेन टार्गेट शिवसेनाच
याशिवाय मागील काळात अफजलखान, मोगलांची फोज या शब्दाची आठवण ठेवणाऱ्या भाजपाचे मेन टार्गेट शिवसेना संपविणे हाच आहे. बंडामुळे अर्धेअधिक काम झाले आहे. आता शिंदेंना मुख्यमंत्री करून सामान्य सैनिकांना त्यांच्या वळचळणीला आणणे, ठाकरेंना एकाकी पाडणे, सेनेचा जीव असणारी मुंबई महापालिका ताब्यात घेणे, मराठा समाजाला प्रभावित करणे आदी अनेक हेतू आहेत. बंडामुळे जनतेत निर्माण झालेला रोषाचा रोख नूतन मुख्यमंत्री कडे वळविणे , जनतेच्या मनासारखे काम नाही झाले तर खापर त्यांच्यावर फोडण्याची तजवीज असे अनेक सुप्त गुप्त हेतू आहे. मास्टर स्ट्रोक असा बहू आयामी, अनेक बरे वाईट कांगोरे असणारा, एकेक लक्ष्यधारी आहे. येत्या काळात आणखी अनेक बाबी स्पष्ट होतील.