BL Investigation Story : मिशन हॉटेल मेट्रो, तीन मुली, दलालांचे नेटवर्क अन्‌ ३०%ची भानगड!; मूळचे बुलडाणेकर पोलीस अधिकारी १ मार्चची कारवाई सांगतात बुलडाणा लाइव्हला...

 
मुंबईच्या वेश्यावस्तीतील दाहक वास्तव गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून सर्वांना कळालं... तिथल्या किंवा कुठल्याही वेश्या वस्तीत मुली कशा येतात, आणल्या जातात हे पाहून अनेकांच्या काळजात धस्स झालं... चित्रपट असला तरी त्‍यात जे दाखवलं, ते सत्यच आहे. अगदी तशाच पद्धतीने वेश्यावस्तीत सर्वकाही चालतं... "बुलडाणा लाइव्ह'चे एक नियमित वाचक आणि मूळचे बुलडाणेकर असलेले पोलीस अधिकारी सध्या बृहन्मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत... ते व त्‍यांच्या सहकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या कारवाईतून मुंबईत कशा पद्धतीने सेक्स रॅकेट चालते, हे पुन्हा एकदा समोर आलं... त्‍या कारवाईचा हा वृत्तांत... वेश्येची मागणी, तिची उपलब्धता, दर, त्‍यात गुंतलेले दलाल आणि हॉटेलवाल्याची मिलिभगत या सर्वांचा या कारवाईतून उलगडा झाला...

7738847884 व 8108114335 हे मोबाइलधारक त्यांच्या साथीदारांसह मुंबई परिसरातील विविध हाॅटेलवर गिऱ्हाईकांना वेश्यागमनासाठी मुली पुरवत असल्याची गोपनीय माहिती साकीनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली.... पोलीस निरिक्षक महेशकुमार ठाकूर यांनी 1 मार्चला सकाळी 10 ला तातडीने पोलीस निरिक्षक श्री. भजनावळे, सहायक पोलीस निरिक्षक श्री. तोडकर, श्री. सांडभोर, पोलीस अंमलदार श्री. धारगळकर, श्री. शेटे, श्री. खरात, श्री. चौरे, संतोष जावळी, श्री. खेडेकर, महिला पोलीस अंमलदार चौगुले व सोनवणे यांना बोलावून घेतले. गोपनीय माहितीबद्दल सांगून कारवाईचा प्लॅन समजावून सांगितला...

अशी सुरू झाली मोहीम...
तीन बोगस गिऱ्हाईक म्‍हणून तयार करण्यात आले. त्‍यातील एकाने 7738847884 या नंबरधारकाला मोबाइलवरून संपर्क केला. त्‍याला व त्याच्या आणखी दोन मित्रांना मुली वेश्यागमनासाठी हव्या असल्याचे सांगितले. समोरच्या व्यक्‍तीने एका मुलीचा रेट 10 हजार रुपये सांगितले. त्‍यानंतर त्‍याने बोगस गिऱ्हाईकाच्या व्हाॅट्‌स अॅपवर मुलींचे फोटो पाठवले. मुली पसंत असल्याचे सांगितल्यावर समोरच्या व्यक्‍तीने साकीनाका (अंधेरी पूर्व, मुंबई) येथील निळकंठ उद्योग भवन इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मुंबई मेट्रो या हाॅटेलमध्ये रूम बुक करा व तुमचा रूम नंबर कळवा. सायंकाळी तीन मुलींना रूमवर पाठवतो, असे सांगितले. तीन मुलींपैकी एका मुलीकडे पैसे देण्यास सांगितले. बोगस गिऱ्हाईकाने तडजोड करून प्रत्येकी मुलीसाठी 2 हजार रुपये देण्याचे ठरले. त्‍यानंतर पोलीस निरिक्षक श्री. भजनावळे यांनी बोगस गिऱ्हाइकाकडे वेश्यागमनाचा मोबदला देण्यासाठी 6 हजार रुपये व प्रत्येकी रुमचे भाडे 1 हजार असे एकूण 9 हजार रुपये दिले. या नोटांच्या झेरॉक्स काढून घेण्यात आल्या, नंबरही लिहून घेण्यात आले. पोलीस निरिक्षक श्री. भजनावळे यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस पथक, दोन्ही पंच, तीन बोगस गिऱ्हाईक कारवाईसाठी लागणारे साहित्य, लॅपटाॅप, प्रिंटर व सीलच्या दुपारी तीनला पोलीस ठाण्यातून बाहेर पडले व निळकंठ उद्योग भवन इमारतीच्या थोड्या अंतरावर जाऊन थांबले...

बस्स...एका मिस्ड कॉलची प्रतीक्षा अन्‌ रेड...
तिन्ही बोगस गिऱ्हाईक मुंबई मेट्रो हाॅटेलकडे रवाना झाले आणि पोलीस पथक बोगस गिऱ्हाइकाच्या मिस काॅलची वाट पाहत थांबले. बोगस गिऱ्हाईकांनी हॉटेलमध्ये जाऊन दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 208, 220 आणि 221 बुक केल्या. तशी माहिती दलाल व्यक्‍तीच्या 7738847884 या मोबाइल नंबरला कळवली. मात्र त्‍याने मुली अन्य गिऱ्हाईकांसोबत बुक असून, काही तासांनी तुमच्याकडे पाठवतो, असे सांगितले. त्‍यामुळे बोगस गिऱ्हाईकाने दुसरा मोबाइल फोन नंबर 8108114335 वर संपर्क करून त्याला व त्याच्या दोन मित्रांना वेश्यागमनासाठी मुलींची मागणी केली. या मोबाइल फोनधारकानेही एका मुलीचा रेट १० हजार सांगितला व लगेच व्हॉट्‌स ॲपवर फोटो पाठवले. मुली पसंत असल्याचे बोगस गिऱ्हाईकाने सांगितले व हॉटेलमध्ये बुक केलेल्या रूमची माहिती दिली. समोरच्या व्यक्‍तीने काही वेळात तीन मुलींना रूमवर पाठवत असल्याचे व तीन मुलींपैकी सकीना (नाव बदलले आहे) नावाच्या मुलीकडे वेश्यागमनाचा मोबदला देण्यास सांगितले.

काही वेळाने 8108114335 या नंबरधारकाने सांगितल्यानुसार त्‍याच्या संपर्कातील तीन मुली हाॅटेलवर आल्या. पैकी एका मुलीने तिचे नाव सकीना सांगितले. बोगस गिऱ्हाइकाने ६ हजार रुपये तिला दिले. त्‍यानंतर तिन्ही गिऱ्हाइक एकेका मुलीसोबत आपापल्या रूममध्ये गेले. त्‍याचवेळी बोगस गिऱ्हाइकाने सहायक पोलीस निरिक्षक श्री. तोडकर यांना मिस काॅल केला. त्‍यानंतर लगेचच पोलीस ॲक्‍शनमध्ये आले. त्‍यांनी हॉटेलवर छापा मारला... कॅश काऊंटरवरील हॉटेल मॅनेजर सुमेध जनार्दन साळवे (36, रा. शास्त्रीनगर बांद्रा पूर्व, मुंबई) याला आधी ताब्यात घेतले. नंतर बोगस गिऱ्हाइकांच्या रूमचा दरवाजा ठोठावून त्‍यांना बाहेर येण्यास सांगितले. तिनही बोगस गिऱ्हाइक प्रत्येकी एका मुलीसह रूममध्ये मिळून आले. तिन्ही मुलींना चौकशीसाठी महिला पोलीस अंमलदारांकडे देण्यात आले... या मुलींपैकी एक ३२ वर्षांची, दुसरी २६ वर्षांची अन्‌ तिसरी २३ वर्षांची होती. यातील एक ठाण्याच्या सम्राट अशोकनगरातील तर अन्य दोन साकीनाकातील रहिवासी होत्या.

सकीनाने सांगितले कसे चालते रॅकेट...
वेश्या म्‍हणून आलेल्या सकीनाकडे सहायक पोलीस निरिक्षक चौधरी यांनी विचारणा केली असता तिने सेक्‍स रॅकेटची पोलखोल केली. तिने सांगितले, साकीनाका येथील दलाल एकमेकांशी संपर्क साधून मुलींना गिऱ्हाइकांनी बुक केलेल्या हाॅटेलवर पाठवितात. आज तिला तिच्या ओळखीच्या चांदनी पठाणने (रा. कळवा, जिल्हा ठाणे) या हॉटेलला पाठवल्याचे तिने सांगितले. गिऱ्हाइकाकडून मिळालेल्या पैशांतील ३० टक्के रक्कम तिला चांदनीकडून मिळते. उरलेले ७० टक्‍के पैसे ती व तिचे साथीदार वाटून घेतात, अशीही माहिती सकीनाने दिली. दुसरी २६ वर्षीय मुलगी आयशाने (नाव बदलले आहे) पोलिसांना सांगितले, की तिला आज रितेश यादवने संपर्क करून हाॅटेलवरील गिऱ्हाइकाकडे पाठविले. तिलाही गिऱ्हाइकाकडून मिळणाऱ्या पैशांतील ३० टक्‍केच रक्‍कम मिळत होती. तिसऱ्या २३ वर्षीय मुलीलाही रितेशनचे पाठवले होते. चांदनी आणि रितेशचे मोबाइल क्रमांक त्यांच्याकडून पोलिसांनी घेतले. मुली गिऱ्हाइकाकडून मिळालेली ७० टक्‍के रक्कम गुगल पे किंवा फोन पे करत होत्या. पोलिसांनी वेश्या दलाल रितेश व चांदनी तसेच मोबाइल नंबर धारक 7738847884 आणि 8108114335 यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.