शेतकऱ्याच्या खात्यात अचानक आले १५ लाख; त्यांना वाटलं मोदींनी पाठवले... त्यांनी गावात बांधलं मोठं घर... आता झाली फजिती!

 
औरंगाबाद : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १५ लाखांचा मुद्दा खूपच गाजला. देशात एवढा काळा पैसा आहे तो बाहेर निघाला तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये येऊ शकतात, असं विधान प्रचारात मोदींनी केलं. त्यानंतर मोदी पंतप्रधान झाल्यावर लोक १५ लाख रुपयांची वाट पाहू लागले. मात्र अद्याप तरी कुणाला १५ लाख मिळाले नाहीत. सत्तेत आल्यावर मोदींनी जनधन योजना सुरू केली. एखाद्या योजनेचा लाभ द्यायचा असल्यास पैसे थेट शेतकरी किंवा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात चार महिन्यांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा झाले. पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळलं म्हणून शेतकऱ्याने पंतप्रधानांना आभाराचा ई-मेलही पाठवला. गावात मोठं घर बांधलं. मात्र नंतर हे पैसे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीऐवजी चुकून त्यांच्या खात्यावर पाठविल्याचे समोर आले आणि शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.


पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील ज्ञानेश्वर औटे यांनी बँक ऑफ बडोदामध्ये जनधन खाते उघडले आहे. त्यांचं गाव पिंपळवाडी गट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते. १७ ऑगस्ट २०२१ ला औटे यांच्या खात्यात अचानक १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये जमा झाले. खात्यात एव्हढे पैसे आले तरी कसे याची चर्चा गावात सुरू झाली. अखेर मोदींनी शब्द पाळलाच असे वाटल्याने शेतकऱ्याने मोदींचे आभार मानत ई- मेल पाठवला. औटे यांच्यावर गावातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. दरम्यान खात्यातील पैशातून औटे यांनी गावात टोलेजंग घर बांधले. मात्र त्यानंतर हे पैसे कुठून आले हे कळल्यावर शेतकऱ्याला धक्काच बसला. पैसे आपले नव्हते तरी आपण घर बांधले, या चिंतेने त्यांना ग्रासले.आता वापरलेले पैसे परत कसे करायचे, असा प्रश्न शेतकरी औटे यांच्यासमोर आहे.

पैसे कुणाचे...
झाले असे, की १५ व्या वित्त आयोगाचे पैसे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला मिळणार होते. बँकेच्या चुकीने हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले. ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला ही भानगड लक्षात आली. बँकेच्या खाते क्रमाकांत एका नंबरच्या चुकीने हा सगळा घोळ झाला. बँक ऑफ बडोदाने सुद्धा आता औटे यांना पत्र पाठवले आहे. त्यात पैसे परत करण्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक एवढे पैसे जमा झाल्यावर त्यांनी बँकेला किंवा पोलिसांना सांगायला पाहिजे होते, असे पिंपळवाडीचे ग्रामसेवक  बाळकृष्ण गव्हाणे म्हणतात. त्यांनी जर पैसे परत केले नाही तर आम्ही गुन्हा दाखल करू, असा इशाराही ग्रामसेवकाने दिला आहे. दरम्यान खर्च केलेली रक्कम टप्प्या टप्प्याने परत करण्याची तयारी शेतकऱ्याने दाखवली आहे.