१०० कोटींच्या खंडणीच्या आरोपानंतरही राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांना अभय
राजीनामा घेणार नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची माहिती; पवारांसोबतच्या बैठकनंतर दिल्लीत निर्णय
नवी दिल्ली : परमबीरसिंग यांच्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करणार्या लेटरबॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल, असा अंदाज होता. रविवारी दिवसभर मुंबई,दिल्लीच्या वर्तुळात त्याचीच चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचें दिवसभर बैठकांचे सत्रही सुरू होते. त्या अनुषंगाने शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्ष गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ठाम उभा असून त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला आहे. महत्वाच्या गुन्हेगारी प्रकरणांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत.परंतु महाराष्ट्र एटीएस व एनआयएच्या तपासातून सर्व गोष्टी समोर येतील. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे नेते कमलनाथ व इतर नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेऊन याप्रकरणाबाबत चर्चा केली. विरोधकांचे आरोप, टीका हे राजकारण असून त्याला तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस बळ पडणार नाही, असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.