शेजारच्या तरुणासोबत वहिनी चॅटिंग करत असल्याचा संशय!; दिराने केला खून; पोलिसांनी असा केला उलगडा!!
सांगली : नवविवाहित वहिनी शेजारच्या तरुणासोबत चॅटिंग करते. तो तिला भेटायला येतो, असा संशय तिच्या दिराला होता. याच संशयातून दिराने वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात बुर्ली गावात २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. दोनच दिवसांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आणि खुनी दिराला अटक केली.
सायली केतन पवार (२२, रा. बुर्ली, ता. पलूस) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कुणाला पवार(२८) असे अटक करण्यात आलेल्या दिराचे नाव आहे. सायली शेजारी राहणाऱ्या श्रेयस पवार याच्याशी व्हाॅट्स अॅपवर चॅटिंग करते. त्याला भेटते, असा संशय कुणालला होता. २३ सप्टेंबरच्या रात्री सायली बेडरूममध्ये एकटी होती. तेव्हा दिर कुणालने तिच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर व हातावर वार केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र कुणालने वहिनी जिना चढताना जिन्यावरून पडल्याचा बनाव केला.
मध्यरात्री तिला सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सायलीला मृत घोषित केले. इकडे सायलीचा मृत्यू झाला असताना त्याच रात्री शेजारच्या श्रेयसने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही घटनांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला असता कुणालनेच सायलीचा खून केल्याचे पोलिसांनी तपासात उघड केले. २५ सप्टेंबर रोजी पलूस पोलिसांनी कुणाल पवारला अटक केली असून, न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.