लेटरबॉम्बचा जाब शरद पवारांनाही विचारा
संजय निरूपम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवर हल्लबोल; महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीसारखे गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.पण त्यातून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी याप्रकरणाचा जाब आता खरे तर शरद पवार यांनाच विचारयला हवा. परमबीरसिंग यांच्या पत्रामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांनी द्यायला हवीत. कारण परमबीरसिंग यांनी पत्रात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांच्या दाव्यात तथ्य असल्यास त्याचा जाब आदरणीय पवार साहेबांनी द्यावा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहेत का? अशीची टीकेची झोड उठवत काँग्रेसने आता या विषयांत ठाम भूमिका घ्यायला हवी, असा सल्लाही निरूपम यांनी ट्विटरवर दिला आहे. एवढ्यावरच न थांबता निरूपम यांनी सचिन वाझे प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य केले ओ. याप्रकरणात आयुक्तांची चूक होती हे गृहमंत्र्यांचे विधान विरोधाभासी असून त्यामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलीन होईल. वाझेप्रकरणात आतापर्यंतच्या तपासून हे सरकारपुरस्कृत हप्ता वसुली कांड असल्याचे दिसून येते आणि त्याचे धागेदोरे थेट शिवसेनेपर्यंत जात आहेत, असे वाटते, असे निरूपम यांनी केले आहे. निरुपम यांनी ट्विट केलेली विधाने ही काँग्रेसची भूमिका आहे की मग ते त्यांचे वैय्यक्तिक मत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वाझे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर परमबीरसिंग यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्या नाराजीतूनच त्यांनी लेटरबॉम्बचे अस्त्र बाहेर काढल्याचे गृहमंत्री देशमुख याचे म्हणणे होते.परंतु त्यांच्या या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची व गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.