महिला डॉक्टरला ऑनलाईन गाऊन पडला सव्वा लाखांना
गाऊन खरेदीचे साडेसातशे रुपये तर गेलेच; बँक खातेही झाले रिकामे
मुंबई : ऑनलाईन खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही तर फसवणुकीचा धोका जास्त असतो. अशी फसवणूक केवळ अशिक्षित मंडळींचीच होते, असे नाही तर शिकली- सवरलेली उच्चशिक्षित माणसेही अशा फसवणुकीला बळी पडतात. याचा प्रत्यय मुंबईत कुलाबा परिसरातील नौदलातील महिला डॉक्टरची झालेली फसवणूक पाहून आला. ऑनलाईन साईटवर ७५० रुपयांना मागवलेला गाऊन तर मिळाला नाहीच. पण त्याची तक्रार करताना डेबीट कार्डची माहिती दिल्याने तिच्या बँक खात्यातून चक्क १ लाख १५ हजार रुपये हॅकर्सनी परस्पर काढून घेतले.नौदलातील महिला डॉक्टरने ७५० रुपयांचा नाईट गाऊन अॅमेझॉनवरून मागवला. ११ मार्चरोजी गाऊनचे पार्सल आल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले. पण तो तिला मिळाला नाही. त्याबाबत कुरिअर कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यावर दहा रुपये पाठवण्यास सांगितले. ते पाठवताना डेबिट कार्डचा तपशील विचारून घेतला. नंतर तिच्या खात्यातून ४० तसेच दोन वेळा २५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. या फसवणुकीविरोधात डॉक्टरने कफ परेड ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.