प्रेम म्हणजे प्रेम असतं… पती ७९ वर्षांचा आजोबा अन् ६६ वर्षांच्या आजीबाईही असतात…!!
सांगली : म्हातारपणी जेव्हा जवळचे नातेवाइक दूर जातात, तेव्हा नवरा आणि बायकोचे नातेच एकमेकांना आधार देत असतात. मात्र आयुष्याच्या या संध्याकाळी जर पती किंवा पत्नी यामधील एकाचा मृत्यू झाला तर जगणं असह्य होत. अशा वेळी एका सोबत्याची आवश्यकता असते. मात्र तुम्ही म्हणाल म्हातारपणात कुठं असा सोबती आणि तोही जीवनसाथी मिळत असतो का? पण असं झालंय मिरज येथील आस्था महिला बेघर केंद्रात. ७९ वर्षांचे आजोबा आणि ६६ वर्षांच्या आजीचा अनोखा विवाह सोहळा इथे नुकताच मोठ्या धुमधडाक्यात पार पडलाय. जुन्या परंपरांना तिलांजली देत या नव्या विवाहाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मिरजेतील या महिला बेघर केंद्रात यापूर्वी अनेक मुलींचे लग्न झालेत मात्र हा सोहळा आगळावेगळा असाच होता.
शालन आजी (६६) या मूळच्या पुण्याच्या. त्यांच्या पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या जीवनाची फरपट सुरू झाली. नातेवाइकांवर आपले ओझे नको म्हणून मिरजेतील आस्था बेघर केंद्रात त्या राहू लागल्या. तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील दादासाहेब साळुंखे (७९) हे सेवानिवृत्त शिक्षक. त्यांची मुलं बाहेरगावी त्यांच्या संसारात व्यस्त आहेत. पत्नीचं निधन झाल्याने एकटं एकटं जगण्याचा त्यांना कंटाळा आला. या उतारवयात भावनिक आधाराची गरज असल्याने मुलांच्या संमतीने त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवरीचा शोध सुरू केला. आस्था बेघर केंद्रात राहणाऱ्या शालन आजींशी त्यांचे विचार जुळले. पसंती झाली. त्यानंतर लग्नाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यात आले. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या फोटोला पुष्पहार घालून, झाडांना पाणी टाकून हा अनोखा विवाह आस्था बेघर केंद्रात पार पडला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी या विवाहासाठी शुभसंदेश पाठविला.