नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी मुंबई : चांगल्या कार्यालयात नोकरी लावून देतो, असे सांगून दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना वसई भागातील नालासोपारा भागात घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणातील दोन तरुणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. नालासोपारा पूर्व येथील एका ३७ वर्षीय महिलेची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती. तिच्या या परिस्थितीचा फायदा तिच्या ओळखीतील दोन तरुणांनी घेतला. त्यापैकी एका तरुण हा त्याच भागात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याने तिला स्वयंपाकाचे काम मिळवून देतो,चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो,असे म्हणत तिच्याशी सलगी वाढवली.तिला त्याच भागातील एका फ्लॅटवर नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला.त्याठिकाणी त्याचा एक मित्रही होता. त्यानेही चाकूचा धाक दाखवून तिला धमकावले व तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला ही महिला घाबरून गप्प बसली. पण नंतर तिने ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.