देशमुख आणि राज्य सरकारला “या’ न्यायालयाचा दणका
मुंबई ः माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सीबीआय आपली कार्यकक्षा ओलांडत असून या चाैकशीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे आता सीबीआय देशमुख यांच्या आरोपाबाबत सर्व अंगांनी तपास करू शकेल.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सचिन वाझे याला सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय आदीबाबत सीबीआयने तपास सुरू केला होता; परंतु त्याला राज्य सरकार आणि देशमुख यांनी आव्हान दिले होते. दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे राज्य सरकार आणि देशमुख यांना चांगलीच चपराक बसली आहे. देशमुख यांच्यावरील आरोप, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या नियुक्तीबाबत आता सीबीआयला तपास करता येणार आहे.