‘महावितरण’चे 11 कर्मचारी गावात शिरून वीज कापत असल्याने लासुरा गावात तणाव!; कोरोना काळात एवढे कर्मचारी जाऊ कसे शकतात?

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महावितरणच्या अन्यायी कारभाराचा नमुना शेगावच्या लासुरा गावात (ता. शेगाव) आज, 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी दिसून आला. महावितरणचे 11 कर्मचारी गावात शिरून बिल थकलेल्यांची वीज कापू लागले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. अव्वाच्या सव्वा वीज बिले नागरिकांना आली आहेत. ते कमी करण्याऐवजी थेट वीज कापण्याचा सपाटा लावण्यात आल्याने ग्रामस्थ …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरणच्‍या अन्यायी कारभाराचा नमुना शेगावच्‍या लासुरा गावात (ता. शेगाव) आज, 27 फेब्रुवारीच्‍या संध्याकाळी दिसून आला. महावितरणचे 11 कर्मचारी गावात शिरून बिल थकलेल्यांची वीज कापू लागले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. अव्वाच्या सव्वा वीज बिले नागरिकांना आली आहेत. ते कमी करण्याऐवजी थेट वीज कापण्याचा सपाटा लावण्यात आल्याने ग्रामस्‍थ संतप्‍त झाले. यावेळी 19 जणांची जोडणी खंडित करण्यात आली. विशेष म्‍हणजे जिल्हाभरात कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रशासनाने बंदी घातली असताना महावितरण कर्मचारी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन कारवाई कशी करू शकतात, असा संतप्‍त सवाल ग्रामस्‍थांनी केला.


वीज कापल्यामुळे लासुरातील 19 घरांत अंधार झाला आहे. नाईलाजाने अनेकांनी गोड्या तेलाचे दिवे लावले. वीज कधी परत जोडणार माहीत नाही. एका महिलेला सहा हजारांचे बिल आले आहे. तिने १ हजार रुपये भरलेही. तरीही तिची वीज कापण्यात आली. या महिलेने आम्‍ही पुढे काय करावं, कसं राहावं, असे प्रश्न बुलडाणा लाइव्हशी बोलताना केले. पथक गावातून जाताच काहींनी स्‍वतःच कनेक्‍शन जोडल्याचेही दिसून आले. हे करत असताना एखाद्या ग्रामस्‍थांचा जीवही गेला असता.

भाजप तालुकाध्यक्षांचा फोन आणि कर्मचारी परत…
गावातील वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष विजय भालतडक यांना कळताच त्यांनी महावितरणच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावातील परिस्‍थिती सांगत पथक परत बोलाविण्याची विनंती केली. त्‍यानंतर हे पथक परत गेल्याचे सांगण्यात आले.

स्‍वाभिमानी शेतकरी संघटना संतप्‍त

कालच स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते रविकांत तुपकर यांनी महावितरणला इशारा देताना कोणत्‍याही नागरिकाची वीज कापली तर फटके देऊ, असा इशारा दिला होता. त्‍यानंतर आज सायंकाळीच महावितरणच्‍या दहाच्‍या वर कर्मचाऱ्यांनी गावात शिरून ही कारवाई केली. त्‍यामुळे स्‍वाभिमानी शेतकरी संघटना संतप्‍त झाली असून, या कारवाईचा नेते श्री. तुपकर यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना निषेध केला. या प्रकरणी उद्या आता श्री. तुपकर कोणती भूमिका घेतात हे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (पहा श्री. तुपकर यांचा व्‍हिडिओ)