मनसैनिकांच्या आततायीपणामुळे सर्वच कामगारांवर अन्याय कशाला?

शिवांगी बेकर्समधील आंदोलनाला हिंसक वळण, संचालकांच्या घरात घुसून अश्लील शिविगाळ
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पारले जी बिस्किट तयार करणाऱ्या शिवांगी बेकर्सच्या व्यवस्‍थापनाकडून कामगारांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसे कामगार सेनेने १० डिसेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने व्यवस्‍थापनाने थेट कंपनीच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मनसैनिक कामगारांनी संचालकांच्या घरी जाऊन धिंगाणा घालत संचालकांच्या पत्‍नीला अश्लील शिविगाळ केली. त्‍यामुळे ११ डिसेंबरला पहिल्या शिफ्टचे कामगार कामाला आले असता व्यवस्‍थापनाने त्‍यांना कंपनी चालवायची नाही असे सांगून परत पाठवले.

मनसैनिकांच्या आंदोलनात मान्यताप्राप्त सात्विक कामगार संघटना सहभागी नाही. तलाव रोड जनुना शिवारात शिवांगी बेकर्स ही कंपनी १९८२ पासून बिस्किट उत्‍पादनात आहे. सध्या या कंपनीत कंत्राटी पद्धतीने पारले जी या बिस्किटाचे उत्‍पादन केले जाते. सध्या कंपनीत ६५० कामगार असून, ती ३ शिफ्टमध्ये चालते. कामगारांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप करून मनसे कामगार सेनेने १० डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

आंदोलनादरम्‍यान काही आततायी कामगारांनी १० डिसेंबरला रात्री ९ च्या सुमारास कंपनीचे संचालक रितेश केडिया यांचे अकोला रोडवरील घर गाठले. सौ. दिप्ती रितेश केडिया यांनी दरवाजा उघडताच सेठ कोठे आहेत?  आपण अशीच कंपनी चालवता का, असे म्‍हणून धिंगाणा घालायला सुरुवात केली. सौ. दिप्ती यांना अश्लील शिविगाळ केली. सौ. केडिया यांनी या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अजय मांडवेकर आणि आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मांडवेकरला अटक केली आहे. या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्‍थापनाने थेट कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतला. काल,११ डिसेंबरला पहाटे सातला पहिल्या शिफ्टचे ९० कामगार कामासाठी आले तेव्हा परत पाठविण्यात आले. त्‍यामुळे कामगार धास्तावले असून, काही कामगारांच्या आततायीपणाची शिक्षा सर्व कामगारांना नको, अशी भावना व्यक्‍त होत आहे.