वाघोबा...भीतीपासून "चाय पे चर्चा'पर्यंत...

वनविभाग मेटाकुटीस, हरणाची शिकार झाली, पण वाघोबानेच केली, हे स्पष्ट नाही!!
 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ४ डिसेंबरपासून आज, १० डिसेंबरच्या रात्री दहापर्यंत वाघोबा नुसता झुलवत ठेवत असून, अजिबात हाती लागत नसल्याने वनविभाग मेटाकुटीस आला आहे. इथं दिसला, तिथं दिसला... मी पाहिला.. असे म्‍हणणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अफवाच जास्त पसरत चालल्या आहेत. आज, १० डिसेंबरला शेगाव तालुक्‍यातील टाकळी हाट शिवारात हरणाचे अर्धे शरीर आढळल्याने वाघोबाने मोर्चा शेगावकडे वळवल्याची चर्चा सुरू झाली. मात्र वनविभागाने या चर्चेला दुजोरा दिलेला नाही. शिकार वाघानेच केली, याबद्दलही स्‍पष्टता नसल्याचे वनविभागाने म्‍हटले आहे.
 

७ डिसेंबरला खामगावातील गोरक्षण रोड परिसरात वासराचा फडशा वन्यप्राण्याने पाडला होता. त्‍या शिकारीचा आळ वाघोबावर आला. मात्र त्‍याची कोणतीही दखल न घेतल्यागत तो अदृश्य स्वरुपातच वावरत आहे. ४ डिसेंबरला पहाटे साडेचारला गाडगेबाबा नगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. त्‍यानंतर ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे लावून त्‍याचा शोध घेतला जात आहे.

पण या कॅमेऱ्यांत तो अजून तरी दिसलेला नाही. अमरावती, बुलडाण्याच्या रेस्क्यू पथकातील ७० जवान त्‍याला शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. मात्र वाघोबा दृष्टीस न पडल्याने हा "काल' चित्रपटातील वाघ आहे काय, तो मिस्टर इंडिया आहे का, अशी गंमतीशीर चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला भितीदायक वाटणारा वाघ आता  खामगावकरांसाठी चाय पे चर्चेचा विषय बनला अाहे. अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाल्याने वाघोबा आता कोणती भूमिका घेतो, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे!