कुत्र्याचा कारनामा मालकाच्या अंगलट! पाळीव कुत्र्याने असं काही केलं की मालकाविरुद्ध गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील घटना...

 
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  घरात म्हणा की शेतात प्रामाणिक प्राणी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कुत्र्याला "राखण्या" म्हणून पाळल्या जातंय. अलीकडे तर शहरात विविध प्रजातीचे देशी,विदेशी कुत्रे  पाळण्याची क्रेझ झाली.मात्र हा कुत्रा उपद्रवी ठरला तर,काय होऊ शकते? याचे उदाहरण जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पाहायला मिळाले. शेतातील गोठ्यावर पाळीव कुत्र्याने एका व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याने थेट मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.धानोरा खुर्द येथे हा प्रकार समोर आलाय. नारायण डाबेराव असे आरोपी मालकाचे नाव असून, जिल्ह्यात गतवर्षी कुत्र्यांनी जवळपास २०० जणांना चावा घेतल्याची आकडेवारी चिंतादायी ठरणारी आहे.

बुलडाणा शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारा उपद्रव सातत्याने वाढत आहे. गतवर्षी कुत्र्यांनी जवळपास २०० जणांना चावा घेतलाय. दरम्यान बुलडाणा नगरपालिकेने कराड येथील वेट्स फॉर ॲनिमल या संस्थेअंतर्गत येथील कानडी शास्त्री परिसरातील एका सेंटरवर जवळपास १५० ते २०० कुत्र्यांची नसबंदी केली होती. परंतु ही मोहीम अल्पावधीतच गुंडाळण्यात आली. आणि पुन्हा शहरात मोकाट कुत्र्यांचा, डुकरांचा सुळसुळाट वाढला. ग्रामीण भागात देखील ही स्थिती आहे.

नांदुरा तालुक्यातील धानोरा खुर्द शेत शिवारात ५ फेब्रुवारीला नारायण डाबेराव यांच्या मालकीच्या एका पाळीव कुत्र्याने अंबादास अर्जुन डाबेराव यांना पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले. याबाबत नांदुरा पोलीस ठाण्याला तक्रार करण्यात आली. अंबादास डाबेराव यांचे शेत आरोपी यांच्या शेताजवळ असल्याने ते दुचाकीने जात होते. दरम्यान आरोपीच्या गोठ्यातील त्यांचा पाळीव कुत्रा अचानकपणे बाहेर येऊन भुंकायला लागला. आरोपी मालकाला आवाज देऊनही ते बाहेर न आल्याने कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. अशा तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी नारायण डाबेराव विरुद्ध कलम २८९ नुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे कुत्रे पाळीव असो की मोकाट? त्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने वेळीच उपायोजना करण्याची मागणी आता पुढे येत आहे.