कंपनीची रोखठोक भूमिका ः बिनशर्त कामावर या, मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करू!

शिवांगी बेकर्स संप प्रकरण
 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुरुवातीला आंदोलनाबद्दल नरमाईची भूमिका घेणाऱ्या शिवांगी बेकर्सच्या व्यवस्‍थापनाने कंपनी संचालकांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर कठोर भूमिका घेतली असून, संपावर गेलेल्या कामगारांनी बिनशर्त कामावर यावे आणि चर्चा करायचीच तर मान्यताप्राप्त संघटनेसोबत चर्चा करू, असे स्‍पष्ट केले आहे. त्‍यामुळे मनसेच्या नेतृत्त्वात आंदोलन करणाऱ्यांची गोची झाली असून, काल, १४ डिसेंबरला जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी याविषयी बोलावलेली बैठकही बारगळली.

शिवांगी बेकर्समध्ये कंत्राटी पद्धतीने पारले जी बिस्किटचे उत्‍पादन केले जाते. कंपनीतील कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्त्वात काही कामगारांनी १० डिसेंबरपासून संप पुकारला आहे. याच दिवशी दोन कामगारांनी कंपनी संचालकांच्या घरी जाऊन धिंगाणा घातला. संचालकांच्या पत्‍नीला अश्लील शिविगाळ केली. या हल्ल्यानंतर कंपनी व्यवस्‍थापनही रोखठोक भूमिका घेण्याच्या मनःस्‍थितीत आले. त्‍यांनीही आता या कामगारांनी बिनशर्त कामावर रूजू व्हावे असे सांगितले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कामगार अधिकारी आनंद राठोड यांनी मनसैनिक कामगार आणि कंपनी संचालकांची बैठक आयोजित केली होती. मात्र कंपनी व्यवस्‍थापनाच्या भूमिकेमुळे बैठक रद्द झाली. कंपनीतील मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा या आंदोलनाला पाठिंबा नाही की सहभागही नाही. त्‍यामुळे मनसैनिक कामगारांचा संपही बैठकीसारखाच बारगळ्यात जमा आहे. कंपनी संचालकांच्या घरी केलेल्या धिंगाण्यामुळे कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्‍थापनाने घेतला होता. त्‍यामुळे या हल्लेखोर कामगारांवर टीका झाली होती.