मलकापूर अर्बन बँकेवर निर्बंध!; ठेवीदार, ग्राहक व्यापाऱ्यांत खळबळ!!

१० हजारच काढता येणार
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील महत्त्वाची बँक असलेल्या मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत. २४ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील. एकाएकी झालेल्या या कार्यवाहीमुळे मलकापूर अर्बनच्या ठेवीदार आणि ग्राहकांत खळबळ उडाली. भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती बँकेचे अध्यक्ष आहेत.

मलकापूर अर्बनच्या राज्यात मुख्य कार्यालयासह २८ शाखा आहेत. बँकेत १ हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने काल, २४ नोव्हेंबरला पत्र पाठवले आहे. बँकेवर निर्बंध लादण्यात आल्याची माहिती मिळताच ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. आज सकाळपासून बँकेत पैसे काढण्यासाठी मलकापूर अर्बनच्या शाखांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र दहा हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे न निघाल्याने १० हजार रुपये का होईना पण पैसे काढणे गरजचे आहे, असे म्हणत ग्राहकांनी पैसे काढले. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या पत्रानुसार पुढील ६ महिन्यांच्या कालावधीत मलकापूर अर्बनला रिझर्व्ह बँकेच्या लिखित मंजुरीशिवाय कोणत्याही कर्जाचे आणि अग्रिमांचे नुतनीकरण व कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. सूचनांच्या अधीन राहून सर्व बचत किंवा चालू खातेदारांना, ठेवीदारांना जास्तीत जास्त १० हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. अर्थात रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बनचा बँकिंग परवाना रद्द केला नसल्याचेही स्पष्टीकरण पत्रात दिले आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकेने निर्बंधांचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवावा. परिस्थितीनुसार या लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करू शकते, असेही पत्रात म्हटले आहे.