वाचा जनावरे कशी नेतात ते चोरून... प्रसंगावधान नागरिकांनी एकाला पकडले, साथीदार पसार, नांदुरा शहरातील घटना
ब्रह्मानंद विठ्ठल चौधरी (४१ रा. संभाजीनगर, नांदुरा) यांनी या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गजानन डवंगे यांना त्यांच्या नांदुरा खुर्दमधील घरी मोटरसायकलने सोडण्यासाठी जात असताना त्यांना चावडी चौकात मंगेश ईश्वर नाईक व संतोष वानखेडे (दोघे रा. भिमनगर, नांदुरा) हे एका गायीला फास टाकताना दिसून आले. यावेळी चौधरी यांनी मोटारसायकल थांबवून त्यांना ही तुमची गाय आहे का? अशी विचारणा केली.
त्यामुळे घाबरून गेलेले दोघे पळून जाऊ लागले. चौधरी यांनी आरडाओरड केल्याने धावून आलेल्या अमोल डाहाके, गोकुल डंबेलकर, जीवन पवार, नंदु गोहर या युवकांनी त्यांचा पाठलाग केला. मंगेशला पकडण्यात आले. त्याने सांगितले, की मी गायी पकडून नदीपर्यंत नेतो. तिथून संतोष वानखेडे हा त्या गायी कोठे नेतो याबाबत माहिती नाही, असे त्याने सांगितले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार महादेव धंदरे करत आहेत. नांदुरा तालुक्यातून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर जनावरे चोरीला गेली असून, त्यांचा तपासही आता या दोघांकडू लागू शकतो, अशी चर्चा आहे.
चिखली तालुक्यात गोठ्यातून दोन बैल पळविले
मुरादपूर (ता. चिखली) येथील गोठ्यात बांधलेले दोन बैल चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पंढरी मुनसींग गाडेकर यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात काल केली. रोजच्या प्रमाणे दोन बैल व काही जनावरे शेतातले काम संपल्यानंतर सायंकाळी गोठ्यात बांधून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चारापाणी करण्यासाठी गोठ्यावर गेले असता गोठ्यातील दोन बैल रंग पांढरा, लाल भुरका, वय अंदाजे सहा ते सात वर्षे अशा वर्णनाचे दोन बैल अंदाजे किंमत ६० हजार रुपये किंमतीचे चोरट्यांनी चोरून नेले. आजूबाजूला शोध घेतला असता कुठेही मिळून आले नाही, असे तक्रारीत गाडेकर यांनी म्हटले आहे. ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार कैलास उगले तपास करत आहेत.