खामगाव, जळगाव जामोद आसूड मोर्चाचे दणाणले!
विदर्भातल्या शेतकऱ्यांवर राज्य सरकारचा अन्याय -आ. आकाश फुंडकर
राज्य सरकार पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने खचला आहे. मात्र पंचनाम्यांची नाटके करून अनेक गावांना अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्याचे पाप राज्य सरकार करीत आहेत. शेतकरी राज्य सरकारला माफ करणार नाही. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही तर सरकारला शेतकरी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे आ. फुंडकर म्हणाले. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा दुपारी दीड वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. अंगावर आसूड ओढणारा पोतराज, बैलगाडी आणि महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा यामुळे मोर्चाचे वेगळेपण दिसून आले. मोर्चात शेतकरी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारची २०२४ मध्ये तेरवी करणार -आ. संजय कुटे
राज्यातले तीन पायांचे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली मात्र शेतकऱ्यांना मदत नाही. मागील वर्षीच्या पीकविम्याचे वाटप होताना मोठी तफावत दिसत आहे. परीक्षा रद्द करून व होणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात मोठा संताप जनतेमध्ये आहे. हा संताप २०२४ मध्ये आघाडी सरकारची तेरवी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात आमदार संजय कुटे यांनी जळगाव जामोद येथील आसूड मोर्चात केला. जळगाव जामोद येथील भाजपच्या आसूड मोर्चाचे उपविभागीय कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले. यावेळी आमदार कुटे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा झाला पाहिजे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मिळाले पाहिजेत. शेतकऱ्यांना पीक विम्यातील तफावत दूर करून तो मिळाला पाहिजे. कोरोना काळातील ग्राहक व शेतकऱ्यांना वीजबिल माफी मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना आजपर्यंतची थकीत कर्जमाफी मिळाली पाहिजे. बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.