उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याबद्दल पालकमंत्री गंभीर!
अर्ध्या रात्री आवाज द्या, मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर ः डॉ. शिंगणे
Oct 26, 2021, 10:51 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उघड्यावरील मांसविक्री तत्काळ बंद करण्यासाठी निर्देश दिले जातील. वारकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. अर्ध्या रात्री आवाज द्या, मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खामगावात दिली.
जिल्हा वारकरी महामंडळातर्फे २४ ऑक्टोबरला कोल्हटकर सभागृहात वारकरी सन्मान सोहळा झाला. त्यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. शिंगणे बोलत होते. अध्यक्षस्थानी रामेश्वर महाराज शास्त्री (मुंबई) होते. वारकरी महामंडळाचे राज्याध्यक्ष कृष्णाजी महाराज रांजणे पाटील, कोषाध्यक्ष फुलसुंदर महाराज, संचालक जालिंदर महाराज काळोखे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष दामूअण्णा शिंगणे, संपर्कप्रमुख राजेंद्र महाराज तळेकर आदींची उपस्थिती होती. कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा देणारे डॉ. नीलेश टापरे, गजानन उन्हाळे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. राजश्री उन्हाळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र महाराज तळेकर यांनी केले. आभार श्रीराम महाराज खेलदार यांनी मानले.