तुम्हाला माहितेय का? बुलडाणा जिल्ह्यातील "या" गावच्या तरुणांचे लग्नच जमेना! ९० टक्के लग्नाळू पोरं कारभारणीच्या शोधात!पण....

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो वाचून आश्चर्य वाटेल तुम्हाला पण ते खरय..मुलींचा बाप या गावच्या तरुणांना मुलगी द्यायला तयारच होत नाही. बिचाऱ्या काही तरुणांचे वय निघून चाललेय. केस पांढरे झालेत मात्र अजूनही त्यांना कारभारीन मिळाली नाही. या गावातील मुलींना स्थळ चालून येत असले तरी मुलांच्या नशिबी मात्र भलतचं आहे. याचा अर्थ गावातील मुल व्यसनी आहेत असा बिलकुल नाही. कष्टाळू आहेत, पैसे कमावण्याची उमेद आहे मात्र असे असले तरी दोनाचे चार हात होण्यासाठी त्यांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागत आहे.  शेगाव तालुक्यातील एकफळ गावातल्या तरुणांच्या नशिबी हे सगळ आलंय! आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत इथले लोकप्रतिनिधी..

काय राजेहो, अस कुठ असतं व्हय? पोरांचे लग्न होत नाही त्याला आमदार, खासदार कसे जबाबदार असतील? आता विकासासोबत  पोरांचे लग्न लावण्याचा ठेका पण त्यांनीच घेतला काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर त्याचे असे आहे एकफळ हे गाव शेगावपासून अवघ्या ८ किमी अंतरावर. या गावाची लोकसंख्या आहे जेमतेम ५००. लोकसंख्येपेक्षा मतदान  करणाऱ्यांची संख्या कमीच...आता तुम्ही सांगा एवढ्या कमी मतदानासाठी तिथं विकास करायची काय गरज आहे? एवढ्या कमी मतदानासाठी गावात नेत्यांना जायले तरी परवडते का? अस नेत्यांना वाटने स्वाभाविक आहे. त्यामुळे या गावात विकासाच्या नावानं बोंबा आहेत. गावात रुग्णालय नाही, गावात अंतर्गत रस्ते नाहीत, नाल्या नाहीत अन् विशेष म्हणजे या गावात जायला रस्ताच नाही.
   
 आता ज्या गावात महागडी फॉर्च्यूनर कार जाणार नाही तिथे नेत्यांनी काय पायी पायी जावं काय?   त्यामुळे लोकप्रतिनिधी गावाकडे फिरकत नाहीत. गावात फक्त चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. गावापासून शेगाव केवळ ८ किलोमिटर असले तरी शेगावात जायला लोकांना २ तास लागतात.  आळसना मार्गे इथले गावकरी शेगावला जातात मात्र आळसना गावापर्यंत जायला रस्ताच नाही. तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असले तरी काही कारणामुळे  ते अडकले आहे.

त्यामुळे  रेल्वे पुलाला लागून ग्रामस्थांना आळसना गावापर्यंत यावे लागते. पावसाळ्यात या रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी साचलेले असते त्यामुळे तो रस्ताही बंद असतो. त्यामुळे गावकऱ्यांना,  विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून जावं लागत.  रात्री ,बेरात्री एखाद्या रुग्णाला दवाखान्यात न्यायची गरज पडलीच तर बैलगाडीशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांची शिक्षणाची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस आला म्हणजे शाळेला दांडी ठरलेलीच.
   
  आता तुम्ही सांगा या अशा गावातील पोरांना मुली देण्याचे धाडस कोणता बाप करेल? जे मुल लग्नानंतर शहरात रहायला तयार होतात त्यांची लग्न होतात. मात्र सगळ्यांना गाव सोडून, आईवडिलांना सोडून ,शेती सोडून शहरात राहणे परवडत नाही.त्यामुळे बिचारी मुले कष्टाळू असले तरी लग्नासाठी मात्र त्यांना मुलगी द्यायला कुणी तयार होत नाही. आता या सगळ्या प्रकाराला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनच जबाबदार आहे असं म्हटल तर चुकीचं ठरेल का? तुम्हीच सांगा...