कापसाच्या झाल्या वाती..! भाव पडल्याने आवक मंदावली; हजारो क्विंटल कापूस घरात पडून

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गेल्या वर्षी १२ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने विकल्या गेलेल्या कापसाला या वर्षी आठ हजार रुपयांचाही दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यावर भर दिला असून हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी कापूस विकायला तयार नसल्याने बाजारपेठेतील आवक मंदावली आहे.

जिल्ह्यातल्या बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस विक्री केली नाही. मात्र अद्याप भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.  दोन दिवसांपूर्वी कापूस ८ हजार प्रतिक्विंटल पर्यंत पोहचला होता, मात्र दोनच दिवसांत पुन्हा दर उतरले. सध्या दरात चढ उतार असले तरी यंदाही मागील वर्षी सारखी दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान सध्या तुरीचे दर ६  हजार ३०० ते ६ हजार ६०० एवढे स्थिर आहेत. तूर ८ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.