शेगावमध्ये मुख्याधिकारी-काँग्रेसमधील वाद पेटला!; महिला आघाडीने डॉ. शेळकेंच्या पोस्टरला भरल्या बांगड्या!!
आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेगाव शहर महिला काँग्रेसतर्फे मुख्याधिकाऱ्यांना बांगड्या भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची भनक लागताच मुख्याधिकारी डॉ. शेळके कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोस्टर्सला बांगड्या भरल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलांच्या ताब्यातून बांगड्या जप्त केल्या. मुख्याधिकारी डॉ. शेळके यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा त्यांची बदली करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
शहराध्यक्ष किरण देशमुख त्यासाठी १७ जानेवारीपासून उपोषणाला बसले. मात्र आंदोलनाची अजून कुणीही दखल घेतली नाही. दरम्यान काल, २० जानेवारी रोजी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ. शेळके यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे शेगाव शहरात सध्या प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकीय नेते असा संघर्ष पेटला आहे.