शेतरस्त्यासाठी नायब तहसीलदाराने ४० हजारांची मागणी केल्याचा आरोप! संतप्त शेतकऱ्याने तहसील कार्यालयातच घेतले विष! शेगावची घटना..!
जलंब(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वर्षभरापासून शेतरस्त्यासाठी तहसील कोर्टाच्या चकरा मारणाऱ्या शेतकऱ्याने तहसीलमध्ये नायब तहसीलदारासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक सुपडाजी सुलताने (५०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते आहे. तालुक्यातील जलंब येथील येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक सुलताने यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांसोबत नेहमी वादविवाद, तंटे होत होते. या संदर्भात शेतकऱ्याने दिवाणी न्यायालय आणि तहसील कार्यालयात रस्त्यासाठी प्रकरण दाखल केले.शेतकरी सुलताने यांच्या आरोपानुसार शेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पवार यांनी आपल्याला दिवाणी न्यायालयातून केस मागे घेण्यासाठी बाध्य करीत तुम्हाला तत्काळ शेतरस्ता उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले. त्यानुसार प्रकरण मागील घेतले.
मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे मागील हंगामात सोयाबीनचे पीक घरी आणता आले नाही. दुसरीकडे तहसील कार्यालयातील प्रकरण खारीज करण्यात आले. याबाबत खामगाव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी शेतात भेट दिली. तीन महिन्यांत तहसील कार्यालयाने रस्ता उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशालाही केराची टोपली दाखवत नायब तहसीलदार पवार यांनी रस्त्याकरिता ४० हजार रुपयांची मागणी केली. आता पेरणीचे दिवस असतानासुद्धा रस्ता उपलब्ध करून दिला नसल्याने संतप्त झालेल्या अशोक सुलताने यांनी आपल्या चिमुकल्या मुलासोबत तारखेवर हजर होत नायब तहसीलदार पवार यांच्या समक्ष वीष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांच्या मदती शेतकऱ्याला येथील सईबाई मोट उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. शेतकऱ्यावर उपचार सुरूत असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
शेतीचे वाद सामोपचाराने मिटवा
शेतीच्या वादातून मागील महिनाभरापासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाद झाले. हाणामारीच्या घटनाही घडल्या. दोन दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील चिंचखेड येथे शेतीच्या वादातून दोन जणांची हत्या करण्यात आली. त्यामुळे शेतीचे वाद समोपचाराने मिटवण्यात यावे, रस्ता व इतर कारणांसाठी तहसील प्रशासनाकडे दाद मागावी, एकमेकांमध्ये वाद घालून भांडण तंटे होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन शेगावचे ठाणेदार विलास पाटील यांनी केले आहे.