बाईंचा कुत्रा अन् अक्षयच्या कोंबड्या! कोंबड्या - कुत्र्यावरून खामगावांत माणसांत राडा..!!

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेजाऱ्यांमध्ये कधी कोणत्या कारणावरून वाद होतील याचा नेम नाही. कधी सांडपाण्याचे कारण ,कधी काही तर काही.. खामगावात शेजाऱ्यांमध्ये असाच वाद झाला. वादाला कारण ठरले ते कुत्रा अन् कोंबडी. तुम्ही पाळलेला कुत्रा माझ्या कोंबड्या खातो,परत जर तुमच्या कुत्र्याने माझ्या कोंबड्या खाल्ल्या तर मारून टाकीन अशी  धमकीच एकाने आपल्याच शेजाऱ्याला दिली आहे. 

अक्षय दिगांबर गावत्रे रा. जगदंबा नगर (खामगाव) असे धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव आहे. झाले असे की अक्षयच्या शेजारी सौ. लता दशरथ गावंडे (४० रा. जगदंबा नगर खामगाव) ह्या राहतात. त्यांनी कुत्रा पाळला आहे. शेजारीच राहणाऱ्या अक्षयने कोंबड्या पाळल्या आहेत. त्यामुळे सौ. गावंडे यांनी पाळलेला कुत्रा हा अक्षयच्या कोंबड्या खातो या कारणाने अक्षयने थेट १३ डिसेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास गावंडे यांच्या घरासमोर हातात बांबू घेऊन गेला.

तुम्ही पाळलेला कुत्रा माझ्या कोंबडया खातो तसेच माझ्या घराजवळ तुमचा कुत्रा दिसला नाही पाहिजे,असे म्हणून शेजारी बसलेल्या कुत्र्याला बांबू मारून जखमी केले. गावंडे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असेही सौ. लता गावंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. खामगाव शहर पोलिसांनी गावंडे यांच्या तक्रारीवरून अक्षय गावत्रे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय बळीराम वरखेडे करीत आहेत.