शेतकरी क्रांती संघटनेचे शेगावात ठिय्या आंदोलन
Feb 4, 2022, 19:30 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील एमएसईबी चौकातील पेव्हर ब्लॉक मागील १५ दिवसांपासून रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली उखडून ठेवण्यात आले. त्यामुळे अपघातात वाढ झाली, असा आरोप करत शेतकरी क्रांती संघटनेने आज, ४ फेब्रुवारीला शेगावच्या एमएसईबी चौकात ठिय्या आंदोलन केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने एमएसईबी चौकातील पेव्हर ब्लॉक काढून टाकले. शेगाव विकास आराखड्या अंतर्गत हे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले होते. याआधीही तीन चार वेळेस पेव्हर ब्लॉक काढून दुरुस्ती करण्यात आले होते. मात्र महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारासोबत अर्थपूर्ण संबंध जोपासले जात असल्याने काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शेतकरी क्रांती संघटनेने केला आहे.
महामार्ग प्राधिकरण विभागाच्या निषेधार्थ शेतकरी क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बिलेवार, दिगंबर इलामे, अरुण सुरवाडे, शेषराव रताळे, सदानंद बावस्कर, राजू शेळके, विलासराव शेळके, राजू कराळे, संकेत बोरसे यांनी ठिय्या आंदोलन केले. वाहतूक विस्कळीत झाल्याने शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.