४ बैल चोरणाऱ्या तिघांच्या जलंब पोलिसांनी आवळल्या मुसक्या! साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

 
जलंब(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्याच्या गोठ्यातून ४ बैल चोरणाऱ्या तिघांच्या जलंब पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरी करण्यासाठी वापरलेला एकूण ७ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे

 कोक्ता शिवारातील प्रशांत अरुण सानंदा यांच्या गोठ्यातून ५ सप्टेंबरला ४ बैलांची चोरी झाली होती. त्यांच्याकडे काम करणाऱ्या नामदेव तुकाराम वाशिमकर यांनी जलंब पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दिलेली होती. दरम्यान एका पडीत शेतात चारपैकी दोन बैल मिळून आले होते. त्यावरून गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथून  गजानन शालीग्राम राऊत(४५) याला ताब्यात घेतले होते. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून विठ्ठल दिलीप आवळे व श्रीकृष्ण नारायण पेसोडे ( रा.पिंप्राळा ,ता.खामगाव) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक मालवाहू चारचाकी वाहन,एक जुनी मोटार सायकल, एक जुना मोबाईल, रोख अडीच हजार असा एकूण ७ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


   जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकाडे, पोहेकॉ मो. शफीक, नापोकॉ नितेश लासुरकर, पोकॉ  गोपाल सोनोने, विश्वास अंभोरे यांनी ही कारवाई केली.