डोळ्यात मिरची पावडर टाकून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोघांची रेखाचित्रे जारी; पहा अन् ओळखत असाल तर पोलिसांना कळवा !
Mar 31, 2022, 21:42 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या व्यापाराला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील लालमाती ते रोहिणखेड रोडवर २८ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. व्यापाऱ्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख असा एकूण ३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लांबवला होता. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दोन अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात होता. दरम्यान व्यापाऱ्याने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी दोन्ही दरोडेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. घटनास्थळी पोलिसांना दरोडेखोरांचा एक बुट सुद्धा मिळून आला आहे. त्यावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. रेखाचित्राशी मिळतेजुळते असलेल्या लोकांची पोलीस पडताळणी करणार आहेत. रेखाचित्रात दाखविलेल्या दरोडेखोरांना ओळखत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
नेमके काय घडले होते
मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार येथे रोहिणखेड येथील विजय नारायण सुरपाटणे (५२) यांचे अलंकार ज्वेलर्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी पाच दरम्यान दुकान बंद करून ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन दुचाकीने घराकडे जात होते.
लाल माती ते रोहिणखेड रोडवर लालमाती शिवारात दोन अज्ञात इसमांनी पाठलाग करून त्यांची दुचाकी अडवली . एकाएकी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दागिने आणि रोख रकमेची बॅग घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.