खऱ्या उंटाच्या "कानात बिड्या' समजून केली नक्कल!; खामगावच्या व्यापाऱ्याला असे पडले महागात!!
Apr 5, 2022, 12:13 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सारडा कंपनीच्या उंट बिडी या अधिकृत ट्रेड मार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी खामगाव येथील व्यापाऱ्याविरुद्ध कंपनीने न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या व्यापाऱ्याला न्यायालयाने समन्स बजावले आहेत. यापूर्वी या व्यापाऱ्याकडून उंटबिडीचा नकली साठा जप्त करून खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
यापूर्वी खामगाव येथील अनिल वसतवाणी याने उंट बिडीचे हुबेहूब नकली लेबल तयार करून बोगस विक्री केल्याचे कंपनीच्या विशेष पथकाला आढळून आले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, वसतवाणी याच्याविरुद्ध खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याच्याकडून उंट बिडीचा नकली साठा जप्त केला होता. यापाठोपाठ सारडा कंपनीने या व्यापाऱ्याविरुद्ध नाशिक जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. याची दखल घेत न्यायालयाने वसतवाणी याला समन्स बजावले आहेत.