आरोग्य खात्यात नोकरीसाठी त्‍याला हवे तिच्याकडून ६ लाख!

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोग्य खात्यात नोकरीला लागण्यासाठी माहेरावरून सहा लाख रुपये घेऊन ये, असे म्‍हणून पतीने विवाहितेचा छळ मांडल्याची घटना मोताळा तालुक्‍यातील तालखेडमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी विवाहितेने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध काल, ४ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे.
सौ.रूपाली सागर कोगदे (रा. तालखेड) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. सागर शंकर कोगदे (रा. भाग्यश्री चेंबर्स, तळेगाव दाभाडे, पुणे), सासरा शंकर कोगदे, सासू सौ. इंदिरा शंकर कोगदे आणि नणंद यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. सुरुवातीचे दोन महिने तिला सासरच्यांनी चांगले वागवले. नंतर आरोग्य खात्यात नोकरीस लागण्यासाठी माहेरहून ६ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून शिविगाळ करण्यात येऊ लागली. विकृत वागणूक देण्यात आल्याचे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. तपास सहायक फौजदार प्रल्हाद वानखडे करत आहेत.