मध्यरात्री शेतात भरला जुगाऱ्यांचा मेळा!; पोलिसांचा छापा पडताच पळापळ..; खामगाव तालुक्यातील घटना
Updated: Feb 13, 2022, 21:27 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री शेतात जुगाऱ्यांचा मेळा भरल्याची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी छापा मारून ९ जणांना ताब्यात घेतले. पोलीस आल्याचे पाहून एकच पळापळ सुरू झाली होती. पण पोलिसांनी सर्वांना पकडलेच. ही कारवाई राहूड (ता. खामगाव) शिवारातील देवळे यांच्या शेतात आज, १३ फेब्रुवारीला पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) करण्यात आली.
मनोज बाबुराव देशमुख (४६, राहूड), जावेद अर्शद हाशमत उल्ला (२४, रा. पिंपळगाव राजा), सादिक उल्ला खान जबी उल्ला खान (३० रा. पिंपळगाव राजा), समीर खान शब्बीर खान (२५, रा. पिंपळगाव राजा), राम प्रतापराव इंगळे (२८, रा. राहूड), शरद जनार्धन पुदारे (४१, रा. राहूड), सहदेव संपत अत्तरकर (४५, रा. राहूड), अनिल आनंदराव इंगळे (४५ रा. राहूड), विनोद देविदास देवले (४२ रा. राहूड) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.
पिंपळगाव राजा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की राहूड शिवारातील देवळेंच्या शेतात जुगार खेळणे सुरू आहे. या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला. सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख २५ हजार ८०० रुपये, ५ मोबाइल, तास पत्ते, ४ मोटारसायकली असा एकूण ३ लाख १ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास एएसआय प्रविणसिंग चव्हाण करत आहेत.