अंबाबरवा अभयारण्यात पेटला वणवा!; ९० हेक्टरवरील वनसंपदा खाक, संग्रामपूर तालुक्यातील घटना
Apr 5, 2022, 11:23 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात ३ एप्रिलला भीषण आग लागून ९० हेक्टरवरील वनसंपदा खाक झाली. सकाळी लागलेली आग ४ एप्रिलच्या सकाळी ११ पर्यंत धुमसत होती. सोनाळाजवळील दक्षिण मांगेरी व सालवण बीटच्या वनखंडात ही आग लागल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
वनविभागाचे शेकडो मजूर, अधिकारी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मेळघाट व्याघ्र क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांनी अभयारण्याला काल सकाळी ११ ला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. ड्रोन कॅमेराद्वारे आग आणखी कुठे लागली आहे का हेही तपासण्यात आले. आग लागण्यामागे वणवा पेटला की गोंद तस्कर व अवैध मार्गाने जंगलातून गुरेढोरे नेणाऱ्यांनी आग लावली याचा तपास केला जात आहे. २८ फेब्रुवारीपासून आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.