उसाच्या शेताला लागलेली आग विझवतांना शेतकऱ्याचा मृत्यू; मलकापूर तालुक्यातील घटना

 
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातील उसाला लागलेली आग विझवतांना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. मलकापूर तालुक्यातील घिर्णी शिवारात आज, ७ एप्रिल रोजी   दुपारी १२ वाजता ही घटना घडली. सुखदेव जगदेव वाघमारे (६५, रा. घिर्णी) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव वाघमारे हे त्यांच्या  गव्हाच्या शेतातील काड जाळत होते. त्यावेळी गव्हाच्या शेतातील आगीची चिंगारी शेजारील शेतकरी सुभाष भोपळे यांच्या उसाच्या शेतात घुसली व उसाला आग लागली.  आपल्यामुळे दुसऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी सुखदेव वाघमारे हे आग विझवण्यासाठी धावले. मात्र आगीमुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर  उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या  दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.