मोताळ्यात दुकाने उघडणाऱ्या 4 व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. तरीही दुकाने उघडणाऱ्या मोताळ्याच्या 4 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोराखेडी पोलीस ठाण्यात मोताळा नगरपंचायतीचे करनिर्धारणा अधिकारी कुलदीप प्रभाकर भोलाने यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोताळा फाटा परिसरातील आदिशक्ती ड्रेसेसचे मालक रामचंद्र उत्तम हिवाळे, सुनील हार्डवेअरचे मालक सुनील जैस्वाल, कुलर दुरुस्तीचे दुकान चालवणारे अनिस शहा, अक्रम शहा, पूजा सायकल एजन्सीचे मालक लीलाधर धनसुख चांडक (सर्व रा. मोताळा) यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल सायंकाळच्या दरम्यान या व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने उघडी ठेवली होती.
तहसीलदारांना निवेदन
आधीच कर्जाचा डोंगर वाढलेला आणि त्यातच कडक निर्बंधांमुळे तोंडचे पाणी पळालेल्या मोताळ्यातील व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन नियम शिथल करण्याची मागणी केली. ठराविक कालावधीसाठी का होईना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे साकडे त्यांनी निवेदन देऊन घातले. सर्व नियम पाळून दुकाने सुरू ठेवू, अशी ग्वाहीसुद्धा निवेदनात दिली आहे.