खामगावात संकल्‍प मेळाव्‍याचा फ्‍लॉप शो! दुपारी १ चा कार्यक्रम रात्री ८ ला; नाना पटोले आलेच नाहीत

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावर शुभ्र पेहराव, गळ्यात तिरंगी रुमाल आणि संकल्प घेण्यासाठी हाताची आवळलेली मूठ अशा अवतारात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे फोटो आज वर्तमानपत्रात छापून आले. निम्मित होते त्यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस जनांच्या भव्य विजय संकल्प मेळाव्याच्या जाहिरातीचे. आज, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि महिला …
 
खामगावात संकल्‍प मेळाव्‍याचा फ्‍लॉप शो! दुपारी १ चा कार्यक्रम रात्री ८ ला; नाना पटोले आलेच नाहीत

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावर शुभ्र पेहराव, गळ्यात तिरंगी रुमाल आणि संकल्प घेण्यासाठी हाताची आवळलेली मूठ अशा अवतारात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे फोटो आज वर्तमानपत्रात छापून आले. निम्मित होते त्यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस जनांच्या भव्य विजय संकल्प मेळाव्याच्या जाहिरातीचे. आज, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र या कार्यक्रमाचा फ्लॉप शो झाल्याचे दिसून आले.

गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याचे पाहून सानंदा यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात गेल्यामुळे आता पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आज नाना पटोले आणि यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ठरला होता. दुपारी १ पासूनच बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते नेत्यांची प्रतीक्षा करत होते. मात्र नेते आलेच नाही. शेवटी दमलेल्या कार्यकर्त्यांत जोश भरण्यासाठी सानंदा आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी रात्री ८ वाजता कार्यक्रम सुरू केला. देशासाठी बलिदान करणाऱ्या महापुरुषांचे स्मरण करण्याचे ठरलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून सानंदा यांनी स्वतःचाच उदोउदो करून घेतला. दोघांनी मिळून नेहमीप्रमाणे भाजप सरकारवर टीका केली. जमलेल्या कार्यकर्त्यांकडून मी काँग्रेस पक्षाचा पाईक आहे. मी काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखेन. भाजपला धडा शिकवेन. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवेन, अशी प्रतिज्ञा करवून घेतली आणि फ्लॉप ठरलेल्या कार्यक्रमाचा शेवट झाला.