ऐकलं का…😲 शेगावात हळदी कुंकवाच्या धर्तीवर पार पडला पुरुषांचा अष्टगंध सोहळा! 😅
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकरसंक्रांत निमित्ताने काही दिवस ज्याप्रमाणे महिलांचे सर्वत्र हळदी- कुंकवाचे कार्यक्रम असतात आणि यामधून त्यांचा आपसात सुसवांद, चर्चा व मनोमिलन होते. अगदीच त्याच धर्तीवर शेगाव शहरातील सुरभी कॉलनीतील मारोती मंदिराच्या प्रांगणात आज, 24 जानेवारी रोजी संध्याकाळी पुरुषांचा अष्टगंध सोहळा पार पडला.
श्यामभाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा अन् आश्चर्यजनक सोहळा पार पडला. शिक्षक रवींद्र माळी व श्यामभाऊ जाधव यांनी हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश सांगितला. महिलांप्रमाणे पुरुषांमध्येही आपसात सुसंवाद व चर्चा घडून यावी, यातून परिसरातील समस्या व विकासात्मक बाबीवर विचारविनिमय करण्यात यावा, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, परिसरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे, महिलांनी सुद्धा वाण वाटताना वस्तूंऐवजी वृक्ष रोप भेट द्यावे, आपसी मतभेद, मनभेद विसरून सर्वांनी चर्चेतून मार्ग काढावे यासाठी हा सोहळा घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्वांना अष्टगंध लावून तीळ- गूळ वितरित करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. जाधव, साहित्यिक कवी विश्वासराव देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरभी कॉलनी अध्यक्ष वसंतराव शेळके, श्री. कोकाटे, श्री. गुप्ता, डॉ. चिकटे, गजानन ठाकरे, एकनाथ पाटील, घनश्याम माळी, पत्रकार राजेश चौधरी, अमित पाटील, अमोल अहिर, नेमाडेबुवा, पोंदेभाऊ, राहुल कोकाटे, रवी टिकार, सुबोध जाधव, मुन्ना पोहरे यांच्यासह सुरभी कॉलनी व दुर्गानगरातील इतर पुरुष मंडळी उपस्थित होती.