सोमी अलीवर झाला होता १४ व्या वर्षी बलात्कार!
अभिनेता सलमान खानची गर्लफ्रेंड राहिलेली पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीवर १४ वर्षांची असताना बलात्कार झाला होता. तिने स्वतः याबाबत सांगितल्याचे खळबळ उडाली आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी सोमी बॉलिवूडमध्ये आली होती. ९० च्या दशकात तिने अनेक हिट चित्रपट दिले. त्याकाळात ती सलमानची प्रेयसी म्हणून वावरत होती. १९९९ मध्ये सलमानसोबत तिचा ब्रेकअप झाला. नंतर तिने बॉलीवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला. सोमी सध्या नो मोअर टीयर्स नावाचा एनजीओ चालवते. याद्वारे ती भारत, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांमध्ये लैंगिक, मानसिक आणि शारीरिक अत्याचार झालेल्या पीडित महिलांना आधार देते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोमी म्हणाली, की पाकिस्तानमध्ये जेव्हा मी ५ वर्षांची होती तेव्हा आमच्या घरात जेवण बनवण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने माझ्यावर तीन वेळा लैंगिक अत्याचार केले. जेव्हा मी ९ वर्षांची होते तेव्हा चौकीदाराने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही अमेरिकेत राहायला गेलो. तेव्हा मी १४ वर्षांची असताना तिथे एका गार्डनमध्ये १७ वर्षांच्या मुलाने माझ्यावर बलात्कार केला. वयाच्या १६ व्या वर्षी मी भारतात आले. माझ्यासोबत घडलेल्या घटनांमुळे मी ‘नो मोअर टीअर्स’ हा एनजीओ चालवण्यास सुरुवात केली, असे सोमी म्हणाली. रोज सकाळी उठल्यावर मी एकच विचार करते की आज कोणाचे तरी आयुष्य वाचवूया. यापेक्षा अधिक चांगले आयुष्य जगण्याचे अजून काय कारण असू शकते?, असे सोमीने सांगून यापुढेही अशीच चांगली कामे करून अनेक आयुष्य वाचविणार असल्याचे सांगितले.